वलयांकित खेळाडू नसले तरीही आम्ही रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो, ही किमया घडविणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर पहिल्या विजेतेपदाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अनुभवी कर्नाटकच्या आव्हानाला बुधवारपासून सामोरे जावे लागणार आहे.
साखळी गटातून बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने बाद फेरीत प्रवेश केल्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. महाराष्ट्राकडे कर्नाटकसारखे तारांकित खेळाडू नसले तरी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवीत महाराष्ट्राने २१ वर्षांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी व प्रभावी गोलंदाजी यांच्या जोरावर महाराष्ट्राने ही मजल गाठली आहे. यापूर्वी फक्त दोन वेळा महाराष्ट्राने ही स्पर्धा जिंकली होती. १९३९-४० मध्ये संयुक्त प्रांत संघावर, तर १९४०-४१ मध्ये मद्रास संघावर मात करीत महाराष्ट्राने रणजी करंडकाला गवसणी घातली होती. त्यानंतर १९९२-९३ चा अपवाद वगळता महाराष्ट्राला अंतिम फेरीतही स्थान मिळविता आले नव्हते. त्या वेळी पंजाबकडून पराभव पत्करल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
कर्नाटकने यापूर्वी सहा वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. त्यांनी यंदाच्या मोसमात सहा सामनेजिंकले आहेत. रॉबिन उथप्पा, आर. विनयकुमार, मनीष पांडे, अभिमन्यू मिथुन अशा खेळाडूंचा समावेश असलेल्या कर्नाटकचे पारडे जड मानले जात आहे; परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदाच्या मोसमात अव्वल व आश्चर्यजनक कामगिरी केली आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, हे त्यांनी कामगिरीनिशी सिद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या केदार जाधवने या मोसमात एक हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर हर्षद खडीवालेसुद्धा तो टप्पा ओलांडण्याच्या उंबरठय़ावर आहे. त्याखेरीज चार फलंदाजांनी यंदा ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. विजय झोलने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला आशिया चषक मिळवून दिला आहे. महाराष्ट्र संघाने नुकतीच २५ वर्षांखालील गटाची सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. या युवा खेळाडूंचे यश त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
दुसरीकडे कर्नाटकच्या यशात द्रुतगती गोलंदाजांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात फलंदाजीतही राहुल लोकेश, करुण नायर, रॉबिन उथप्पा यांनी सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. स्टुअर्ट बिन्नी हा त्यांचा अष्टपैलू खेळाडू सध्या न्यूझीलंडमध्ये भारताकडून खेळत आहे. एच. एस. शरथ हा खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यांची अनुपस्थिती कर्नाटकला तीव्रतेने जाणवू शकेल.

महाराष्ट्र
महाराष्ट्र : रोहित मोटवानी (कर्णधार), हर्षद खडीवाले, चिराग खुराणा, केदार जाधव, संग्राम अतितकर, अंकित बावणे, अनुपम संकलेचा, अक्षय दरेकर, पुष्कराज चव्हाण, समद फल्लाह, श्रीकांत मुंडे, विजय झोल, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, निखिल नाईक, राहुल त्रिपाठी.

कर्नाटक
कर्नाटक : आर. विनय कुमार (कर्णधार), रॉबिन उथप्पा, लोकेश राहुल, मयांक अगरवाल, मनीष पांडे, करुण नायर, सी. एम. गौतम, श्रेयस गोपाळ, अभिमन्यू मिथुन, रोनित मोरे, अब्रार काझी, के. पी. अप्पन्ना, गणेश सतीश, अमित वर्मा, एस. अरविंद.

दोन्ही संघांचे हुकमाचे पत्ते
फलंदाजी : रोहित मोटवानी, केदार जाधव, हर्षद खडीवाले, विजय झोल, संग्राम अतितकर, अंकित बावणे.
गोलंदाजी : समाद फल्लाह, अनुपम सकलेचा, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, श्रीकांत मुंढे, अक्षय दरेकर.

फलंदाजी : रॉबिन उथप्पा, मयांक अगरवाल, मनीष पांडे, गणेश सतीश, सी. एम. गौतम, करुण नायर, लोकेश राहुल.
गोलंदाजी : आर. विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, रोनित मोरे, के. अप्पन्ना, अब्रार काझी.

कर्णधारांचे बोल
यंदा आम्ही सांघिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. तशीच कामगिरी येथे अपेक्षित आहे. खेळपट्टी गोलंदाजीस अनुकूल असली तरी त्याचे दडपण आमच्यावर नाही. मुंबई व पश्चिम बंगालविरुद्ध विजय मिळविल्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे. कठीण आव्हानास सामोरे जाण्याची क्षमता आमच्याकडे आहे. कर्नाटकच्या स्टार खेळाडूंबाबत भीती वाटत नाही. आम्ही येथे विजेतेपद मिळविण्यासाठीच आलो आहोत.
-रोहित मोटवानी

अंतिम फेरीत यापूर्वी सहा वेळा आमचा संघ विजेता झाला असल्यामुळे अंतिम लढतीचे कोणतेही दडपण नाही. एच. एस. शरथ व स्टुअर्ट बिन्नी यांची अनुपस्थिती आम्हाला जाणवणार असली तरी आम्ही येथे महाराष्ट्राचा पराभव करण्यासाठीच आलो आहोत. मात्र महाराष्ट्राला आम्ही कमी लेखत नाही. त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही सावधपणेच खेळणार आहोत.
-आर. विनय कुमार

प्रशिक्षकांचे बोल
बऱ्याच वर्षांनी आम्ही अंतिम फेरी गाठली असल्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतच खेळणार आहोत. कर्नाटक संघामध्ये वलयांकित खेळाडू असले तरी त्यांचे कोणतेही दडपण आमच्यावर नाही. विजेतेपद मिळविण्यासाठी चालून आलेली ही हुकमी संधी आहे. ती साध्य करण्यासाठी शेवटपर्यंत जिद्दीने खेळणार आहोत.
-सुरेंद्र भावे

स्टुअर्ट बिन्नी व एच. एस. शरथ यांच्या अनुपस्थितीतही आमचा संघ बलवान आहे. वेगवान गोलंदाजी ही आमची जमेची बाजू असली तरी फिरकी गोलंदाजीतही आम्ही कमकुवत नाही. महाराष्ट्राचा संघ तुल्यबळ आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. त्रयस्थ ठिकाणी सामना, ही खेळाडूंूच्या भवितव्यासाठी चांगली गोष्ट आहे.
-जे. अरुण कुमार

खेळपट्टी
राजीव गांधी स्टेडियमवरील खेळपट्टी गोलंदाजीस अनुकूल राहील. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन राहणार नाही. पहिले दोन दिवस खेळपट्टीवरील गवताचा लाभ द्रुतगती गोलंदाजांना मिळेल व त्यानंतर फिरकी गोलंदाजांना साथ मिळेल. नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. पाचही दिवस खेळपट्टीवर चेंडू उसळत राहण्याची शक्यता आहे. खेळपट्टीभोवती हिरवेगार मैदान असल्यामुळे क्षेत्ररक्षकांना बिनधास्तपणे सूर मारून आपली कामगिरी करता येईल.
-पी. आर. विश्वनाथन, क्युरेटर