आगरतळा : कर्णधार अंकित बावणे आणि शशांक गुगळे यांच्या अर्धशतकांच्या बळावर क-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने त्रिपुरावर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सहा गुणांच्या कमाईसह महाराष्ट्राच्या खात्यात आता २१ गुण जमा आहेत.

विजयासाठीचे २०४ धावांचे लक्ष्य गाठताना महाराष्ट्राच्या बावणे आणि गुगळे यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी केली. राणा दत्ताने गुगळेला ५७ धावांवर पायचीत करून ही जोडी फोडली. मग बावणेने अथर्व काळेसह (२२) चौथ्या गडय़ासाठी ४३ धावांची भागीदारी केली, तर अझिम काझीसह (३१) पाचव्या गडय़ासाठी ४७ धावांची भागीदारी केली. या दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्यांमुळे महाराष्ट्राने विजयी लक्ष्य ५५.५ षटकांत पार केले. बावणेने ७ चौकारांसह नाबाद ६१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा (पहिला डाव) : १२१

महाराष्ट्र (पहिला डाव) : २०८

त्रिपुरा (दुसरा डाव) : २९०

महाराष्ट्र (दुसरा डाव) : ५५.५ षटकांत ५ बाद २०५ (अंकित बावणे नाबाद ६१, शशांक गुगळे ५७; राणा दत्ता ३/३८)

निकाल : महाराष्ट्र पाच गडी राखून विजयी

गुण : महाराष्ट्र ६, त्रिपुरा ०

मुंबईचा हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना अनिर्णीत

धरमशाला : मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील ‘ब’ गटाचा रणजी करंडक क्रिकेट सामना गुरुवारी अनिर्णीत राहिला. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवता आला नाही. मुंबईच्या खात्यावर आता सहा सामन्यांद्वारे फक्त १३ गुण जमा असल्यामुळे बाद फेरीची वाट बिकट झाली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर फक्त सोमवारीच खेळ होऊ शकला. मुंबईने पहिल्या डावात ३७२ धावांची मजल मारली. यात सर्फराज खानच्या नाबाद २२६ धावांचे महत्त्वाचे योगदान होते. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी खेळ होऊ शकला नाही.