चिराग खुराणा व श्रीकांत मुंढे यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला राजस्थानविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात निसटती आघाडी मिळविता आली.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात राजस्थान संघाचा पहिला डाव २७० धावांमध्ये रोखण्यात महाराष्ट्राच्या गोलंदाजांना यश मिळाले. मात्र त्यास उत्तर देताना महाराष्ट्राची एक वेळ ६ बाद १२४ अशी स्थिती झाली होती. या मोसमात अनेक वेळा संघास तारणाऱ्या खुराणा व मुंढे यांनी बुधवारीही महाराष्ट्राचा डाव सावरला. त्यांनी केलेल्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर महाराष्ट्रास दिवसअखेर ९ बाद २७४ धावांपर्यंत पोहोचता आले.
राजस्थानने ७ बाद २४९ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला मात्र आणखी केवळ २१ धावांची भर घातल्यानंतर त्यांचा डाव आटोपला. कालचा शतकवीर पुनीत यादव १२७ धावांवर तंबूत परतला. त्याने १७ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. महाराष्ट्राकडून समाद फल्लाह याने ४९ धावांमध्ये चार बळी घेतले.
हर्षद खडीवाले (३२) व कर्णधार रोहित मोटवानी (४३) यांनी पहिल्या फळीत दमदार खेळ करूनही महाराष्ट्राचे सहा मोहरे १२४ धावांमध्ये तंबूत परतले. त्या वेळी महाराष्ट्र संघ आघाडी घेणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. तथापि खुराणा व मुंढे यांनी १३० धावांची भागीदारी केली व संघाच्या डावास आकार दिला. मुंढे याने ८८ चेंडूंमध्ये ६० धावा करताना सात चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. खुराणा याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना नऊ चौकारांबरोबरच एक षटकारही ठोकला. खेळ संपला त्या वेळी समाद फल्लाह (नाबाद २) हा त्याच्या साथीत खेळत होता. खुराणा याचे शतक पूर्ण होण्यासाठी फल्लाह त्याला कशी साथ देणार हीच उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थानकडून पंकजसिंग व दीपक चहार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक-राजस्थान पहिला डाव ९८.१ षटकांत २७० (पुनीत यादव १२७, अरिस्थ सिंघवी ४३, समाद फल्लाह ४/४९) महाराष्ट्र पहिला डाव ७२ षटकांत ९ बाद २७४ (रोहित मोटवानी ४३, चिराग खुराणा खेळत आहे ८२, श्रीकांत मुंढे ६०, समाद फल्लाह खेळत आहे २, पंकजसिंग ३/८२, दीपक चहार ३/६३, अनिकत चौधरी २/८७)