शार्दूल ठाकूर याच्यासह मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत दिल्लीसारख्या बलाढय़ संघास २०४ धावांनी धूळ चारली आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. त्यांना आता गतविजेत्या कर्नाटकच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
विजयासाठी ४४० धावांच्या लक्ष्यास सामोरे जाताना दिल्ली संघाने ४ बाद ११० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी रजत भाटिया व मनन शर्मा ही जोडी खेळत होती. त्यांचा तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासह त्यांचे उर्वरित फलंदाज किती वेळ मुंबईला झुंज देतात हीच उत्सुकता होती, मात्र मुंबईच्या ठाकूर (३/५९), बलविंदरसिंग संधू (३/३५) यांच्या अचूक माऱ्यापुढे दिल्लीचा डाव २३६ धावांमध्ये कोसळला. भाटियााने सर्वाधिक ४९ धावा केल्या. प्रदीप संगवान (नाबाद २६) व परविंदर अवाना (२४) यांनी शेवटच्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दिल्लीस २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. पहिल्या डावात केवळ ४९ धावा करणारा सेहवाग दुसऱ्या डावात १९ धावांवर बाद झाला.
मुंबईच्या ठाकूर याने या सामन्यातील दोन्ही डावांत मिळून ११३ धावांमध्ये आठ बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याला विल्कीन मोटा (२/५५) व हरमितसिंग (२/५५) यांचीही साथ लाभली.
मुंबई व कर्नाटक यांच्यातील उपान्त्य फेरीचा सामना २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : १५६ व ४५०
दिल्ली : १६६ व २३६ (रजत भाटिया ४९, प्रदीप संगवान नाबाद २६; शार्दूल ठाकूर ३/५९, बलविंदरसिंग संधू ३/५५, विल्कीन मोटा २/५५, हरमित सिंग २/५५).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 5:11 am