स्थानिक क्रिकेटमधील बलाढय़ संघ म्हणून ख्याती असलेला मुंबईचा संघ रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या एलिट ‘ब’ गटातील लढतीत विजय मिळवून घरच्या मैदानावरील पराभवाची कोंडी फोडण्यासाठी उत्सुक आहे.

आतापर्यंत अनुक्रमे चर्चगेटच्या वानखेडे स्टेडियम आणि शरद पवार स्टेडियम येथे झालेल्या घरच्या मैदानांवरील दोन सामन्यांत मुंबईला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईच्या खात्यात चार सामन्यांतून दोन पराभव, एक विजय आणि एका अनिर्णित सामन्याचे नऊ गुण जमा असून ते गुणतालिकेत तेराव्या स्थानी आहेत.

मुंबईचा नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ भारत ‘अ’ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर गेले आहेत, तर श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर हे मुंबईचे खेळाडू सध्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.

त्यामुळे सामन्यातसुद्धा तमिळनाडूविरुद्ध दीडशतक साकारणारा आदित्य तरे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याला फलंदाजीत सिद्धेश लाड, शाम्स मुलानी, जय बिश्त यांची मोलाची साथ लाभेल. गोलंदाजीत मुंबईची प्रामुख्याने तुषार देशपांडे आणि रॉयस्टन डायस यांच्यावर मदार असून शशांक अत्तार्डेच्या अष्टपैलू कामगिरीवरही चाहत्यांच्या नजरा आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशची भिस्त रिंकू सिंग, अंकित राजपूत, मोहम्मद सैफ यांच्यावर आहे.

*  सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

*  स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई</p>