सूर्यकुमारचे झुंजार शतक; बडोद्याकडे पहिल्या डावात आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलेल्या मुंबईच्या संघाने आघाडीची संधी तिसऱ्या दिवशी गमावल्यानंतर आता शुक्रवारी अखेरच्या दिवशी निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बडोद्याने पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या झुंजार शतकी खेळीच्या बळावर मुंबईचा सामना वाचवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या ब-गटातील रणजी सामन्यात मुंबईने सलामीवीर भूपेन लालवाणीला (३) लवकर गमावले. परंतु सूर्यकुमारने १३० चेंडूंत १७ चौकार आणि ३ षटकारांसह १३४ धावांची खेळी साकारत मुंबईला सुस्थित राखले. ११ धावांवर जीवदान मिळालेल्या सूर्यकुमारने त्याच्या आक्रमक शैलीत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे १४वे शतक साकारले.

सूर्यकुमारने सर्वप्रथम जय बिस्ताच्या (४६) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ११९ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ भटच्या गोलंदाजी जय स्लिपमध्ये हार्विक देसाईकडे झेल देऊन बाद झाला. मग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अष्टपैलू शाम्स मुलानीने सूर्यकुमारच्या साथीन चौथ्या गडय़ासाठी ९८ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेद्रसिंह जडेजाने सूर्यकुमारला पायचीत करून ही जोडी फोडली. त्यानंतर मुलानीने सातत्यापूर्ण फलंदाजी करणाऱ्या सर्फराज खानसह चौथ्या गडय़ासाठी नाबाद ६३ धावांची भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा मुलानी ६७ धावांवर आणि सर्फराज २५ धावांवर खेळत होते.

त्याआधी, मुंबईच्या पहिल्या डावातील २६२ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना सौराष्ट्रने पहिला डाव ६ बाद २५७ धावसंख्येवर सुरू केला. चिराग जानीच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीमुळे सौराष्ट्रला ३३५ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रॉयस्टन डायसने ६४ धावांत ४ बळी घेतले, तर मुलानी आणि शशांक अत्तार्डे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : २६२

*  सौराष्ट्र (पहिला डाव) : ११४.२ षटकांत सर्व बाद ३३५ (शेल्डन जॅक्सन ८५, चिराग जानी ८४; रॉयस्टन डायस ४/६४)

*  मुंबई (दुसरा डाव) : ५३ षटकांत ३ बाद २८५ (सूर्यकुमार यादव १३४, शाम्स मुलानी खेळत आहे ६७; पार्थ भट १/४८)