आजपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्रविरुद्ध सामन्यात विजय अनिवार्य

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ-गटातून बाद फेरी गाठण्यासाठी झगडणाऱ्या मुंबई संघाला शनिवारपासून सौराष्ट्रविरुद्ध सुरू होणारी लढत जिंकणे अनिवार्य असेल. मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीची उणीव मुंबईला या सामन्यात तीव्रतेने भासणार आहे.

‘‘धवलने गुरुवारी सराव सत्राला हजेरी लावली, परंतु तो १०० टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला या सामन्यासाठी वगळण्यात आले आहे,’’ असे मुंबईचा यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरेने सांगितले.

४१ वेळा रणजी विजेतेपद जिंकणारा मुंबईचा संघ ‘अ’ आणि ‘ब’ अशा एकत्रित गटांच्या गुणतालिकेत १३व्या स्थानावर आहे. मुंबईच्या खात्यावर ५ सामन्यांमध्ये ८ गुण जमा आहेत, तर सौराष्ट्रचा संघ सर्वाधिक २५ गुणांसह (६ सामने) गुणतालिकेत आघाडीवर आहे. दोन सलग विजयांसह मुंबईत दाखल झालेल्या सौराष्ट्रविरुद्ध निर्णायक विजय मिळवणे मुंबईसाठी मुळीच सोपे नसेल. त्यामुळे बाद फेरी गाठण्याचे मुंबईचे स्वप्न धूसर होत चालले आहे.

‘‘आव्हान टिकवण्यासाठी आता उर्वरित सर्वच सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. सध्या तरी सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या सामन्यात सर्वोत्तम निकाल आम्ही देऊ,’’ असा विश्वास तरेने व्यक्त केला.

सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात फलंदाज एकनाथ केरकरसुद्धा दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता नाही. शनिवारी सकाळी तंदुरुस्ती चाचणीनंतर एकनाथबाबतचा निर्णय होईल, असे तरेने सांगितले.

सौराष्ट्रचा कर्णधार आणि डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी अधिक आत्मविश्वासाने उतरत आहे. या सामन्याबाबत तो म्हणाला, ‘‘दोन निर्णायक विजयांमुळे सौराष्ट्रचा संघ अधिक ताकदीने मुंबईशी सामना करणार आहे. हा सामना आम्ही आरामात जिंकू.’’

मुंबईने सौराष्ट्रला मागील दोन सामन्यांत नमवले होते. ही आकडेवारी मुंबईसाठी आशादायी ठरू शकेल. मुंबईची मदार कर्णधार सिद्धेश लाडवर (५३० धावा) असेल. याशिवाय आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर सौराष्ट्रच्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरू शकेल. तसेच अष्टपैलू शुभम रांजणे आणि शिवम दुबे (४८९ धावा) यांच्याकडे मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देण्याची क्षमता आहे. मुंबईचा वेगवान आणि फिरकी मारा अतिशय कमकुवत आहे. दुबेने (१७ बळी) गोलंदाजीतसुद्धा चमक दाखवली आहे.

सौराष्ट्रला चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांच्यासह नुकतीच निवृत्ती पत्करणारा जयदेव शहाची (४२७ धावा) उणीव भासू शकेल. मात्र हार्विक देसाई (४१२ धावा), अर्पित वासावडा (३७९ धावा) आणि शेल्डन जॅक्सन (३४३ धावा) यांच्यावर सौराष्ट्रच्या फलंदाजीची मदार असेल. गोलंदाजीत धर्मेद्र जडेजा त्यांचा आधारस्तंभ असेल. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने आतापर्यंत ३२ बळी मिळवले आहेत. याशिवाय उनाडकट (९ बळी) आणि चेतन सकारिया (१३ बळी) त्यांच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील.