रणजी हंगामात सलामीच्या लढतीत नवख्या जम्मू आणि काश्मीरकडून चीतपट झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबईने उत्तर प्रदेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. मात्र तब्बल ४० रणजी जेतेपदे नावावर असणाऱ्या मुंबईचा आता आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करू न शकणाऱ्या बंगालशी सामना होणार आहे. उत्तर प्रदेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतरही निवड समितीने संघात घाऊक बदल करत सर्वच खेळाडूंना इशारा दिला आहे. कानपूरला कडाक्याच्या थंडीनंतर मुंबईचा संघ आता उष्ण, दमट हवामानाच्या कोलकात्यात दाखल झाला आहे. तीन सामन्यांनंतर ७ गुणांसह मुंबई चौथ्या स्थानी आहे. 

लक्ष्मीरतन शुक्लाच्या नेतृत्वाखाली खेळणारा बंगालचा संघ घरच्या मैदानावर विजयी सलामीसाठी उत्सुक आहे. युवा प्रीतम चक्रवर्तीला पदार्पणाची संधी मिळणार आहे. अशोक दिंडावर गोलंदाजीच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. मनोज तिवारी, सुदीप चॅटर्जी आणि लक्ष्मी रतन शुक्लावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
मुंबईसाठी अष्टपैलू शार्दूल ठाकूर महत्त्वपूर्ण असणार आहे. १९ वर्षांखालील संघासाठी शानदार कामगिरी करणाऱ्या सर्फराझ खान, अखिल हेरवाडकर, श्रीदीप मंगेला यांच्या समावेशाने मुंबईच्या संघात नवा दमाच्या खेळाडूंची भर पडली आहे.