News Flash

Ranji Trophy : सौराष्ट्राच्या शेपटाने मुंबईला झुंजवलं, ‘खडुसआर्मी’चं आव्हान संपुष्टात

धर्मेंद्रसिंह जाडेजा आणि कमलेश मकवाना जोडीने मुंबईचा विजय हिरावला

स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबईचं रणजी क्रिकेट स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. सौराष्ट्राविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यातच हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना पाऊस आणि खराब हवामानामुळे रद्द झाल्यामुळे, मुंबईला सौराष्ट्राविरुद्ध निर्णयाक विजयाची गरज होती. दुसऱ्या डावात विजयासाठी २९० धावांचं आव्हान दिल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली, मात्र सौराष्ट्राच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी संयमी खेळ करत सामना अनिर्णित राखला.

पहिल्या डावात मुंबईने सर्फराज खान आणि शम्स मुलानीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर २६२ धावांचा पल्ला गाठला. सर्फराजने ७८ तर मुलानीने ६० धावांची खेळी केली. त्यांना सलामीवीर जय बिस्तानेही ४३ धावा करत चांगली साथ दिली. दुर्दैवाने पहिल्या डावात मुंबईचे नावाजलेले फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकले नाहीत. सौराष्ट्राकडून पहिल्या डावात धर्मेंद्रसिंह जाडेजाने निम्मा संघ गारद केला…त्याला प्रेरक मंकड आणि कुशांग पटेलने प्रत्येकी २-२ तर कमलेश मकवानाने एक बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. मधल्या फळीत शेल्डन जॅक्सनच्या ८५ धावा आणि मधल्या फळीत त्याला चिराग जानीने नाबाद ८४ धावांची खेळी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर, सौराष्ट्राने मुंबईचं आव्हान पार केलं. ३३५ धावांत सौराष्ट्राचा पहिला डाव आटोपला, मात्र ७३ धावांची निर्णयाक आघाडी घेण्यात सौराष्ट्र यशस्वी ठरलं. पहिल्या डावात मुंबईकडून रोस्टन डायसने ४ तर शम्स मुलानी आणि शशांक अत्राडेने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी आपल्या खडुसआर्मी या नावाला साजेसा खेळ केला. कर्णधार सूर्यकुमार यादवचं शतक आणि त्याला शम्स मुलानीने ९२ धावा करत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ३६२/७ या धावसंख्येवर आपला डाव घोषित करत सौराष्ट्राला विजयासाठी २९० धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या डावात सूर्यकुमार यादवने १३४ तर शम्स मुलानीने ९२ धावा केल्या. दुसऱ्या डावात सौराष्ट्राच्या गडाला खिंडार पाडण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यशही आलं. अखेरच्या दिवशी पहिल्या दोन सत्रांच्या खेळात मुंबईने ८३ धावांत सौराष्ट्राचे ७ गडी माघारी धाडले. चहापानानंतरच्या सत्रात मुंबईला विजयासाठी केवळ ३ बळींची गरज होती. मात्र कमलेश मकवाना आणि धर्मेंद्रसिंह जाडेजा या जोडीने संपूर्ण सत्र खेळून काढत मुंबईची निर्णयाक विजयाची संधी हुकवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 5:28 pm

Web Title: ranji trophy mumbais challange comes to an end as saurashtra manage to draw a game psd 91
Next Stories
1 Women’s T20 Series : भारतीय महिलांच्या पदरी पराभव, इंग्लंड विजयी
2 Ind vs NZ : भारतीय खेळाडूंना क्षेत्ररक्षणातली कामगिरी सुधारण्याची गरज
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : निर्णायक विजयासाठी आज मुंबईचा संघर्ष
Just Now!
X