सलामीवीर स्वप्निल गुगळेच्या धडाकेबाज शतकामुळेच महाराष्ट्राला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ६ बाद ३१२ धावांची मजल गाठता आली.
गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे त्यांची ५ बाद १६६ अशी स्थिती होती; परंतु गुगळेने रणजीतील पहिले शतक नोंदवताना चिराग खुराणाच्या साथीने शतकी भागीदारी केली. त्यामुळेच महाराष्ट्राला तीनशे धावांपलीकडे पोहोचता आले.
 दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. महाराष्ट्राचे हर्षद खडीवाले (३), कर्णधार रोहित मोटवानी (१९), अंकित बावणे (१८), राहुल त्रिपाठी (११), केदार जाधव (६) हे मातब्बर फलंदाज तंबूत परतले.
कारकीर्दीतील चौथा रणजी सामना खेळणाऱ्या गुगळेन ३१३ मिनिटांच्या खेळात १७४ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २३ चौकार व २ षटकार अशी फटकेबाजी केली. खुराणाने पाच चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ९० षटकांत ६ बाद ३१२ (स्वप्निल गुगळे १७४, चिराग खुराणा खेळत आहे ५५; सुमीत नरवाल १/३०, वरुण सूद १/४२).