Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेत आजपासून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. यातील विदर्भ विरुद्ध केरळ या सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादव याने ४८ धावांत ७ बळी टिपून आपल्या धारदार गोलंदाजीची कमाल दाखवून दिली. उमेशच्या गोलंदाजीच्या जोरावर विदर्भने केरळचा पहिला डाव पहिल्याच सत्रात १०६ धावांवर गुंडाळला.

विदर्भच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय उमेशने सार्थ ठरवला. उमेशने ४८ धावा देत केरळचा पहिला डाव १०६ धावांवर संपुष्टात आणला. सामन्याच्या सुरुवातीलाच विदर्भचे रजनीश गुरबानी आणि उमेश यांनी भेदक मारा केला. मोहम्मद अझरुद्दीन आणि जोसेफ यांना बाद करून उमेशने केळीच्या फलंदाजीला धक्का दिला. गुरबानीनेही त्याला चांगली साथ देत पी राहुल याला माघारी पाठवले. पुढे उमेशने मनोहरन आणि कार्तिक यांना माघारी धाडत केरळची अवस्था ५ बाद ४० अशी केली होती. खेळपट्टीवर झुंज देण्याचा प्रयत्न करणारा सचिन बेबी २२ धावांवर गुरबानीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विष्णू विनोद याने एक बाजू लावून धरली. पण उमेशने दुसऱ्या बाजूने जलज सक्सेना, बेसिल थंपी आणि संदीप वारियार याला तंबूत पाठवले. तर गुरबानीने निधीशला बाद करत केरळचा डाव १०६ धावांवर संपुष्टात आणला. याबरोबरच उमेश यादवने २६ डावात तब्बल सातव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची किमया केली.

दरम्यान, आता केरळचा संघ या आव्हानाचा बचाव कसा करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.