रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने हॅटट्रिकची नोंद केली. रणजी करंडक स्पर्धेतील ७५ वी तर या हंगामातील ही पहिली हॅटट्रिक आहे. मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याला शुक्रवारी नागपूरच्या मैदानावर सुरुवात झाली. कर्णधार विनय कुमारने या सामन्यातील पहिल्या डावात हॅटट्रिकसह सहा बळी घेतले. विनय कुमारच्या माऱ्यासमोर मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. धवल कुलकर्णी वगळता एकालाही मैदानात तग धरता आला नाही. धवलने केलेल्या ७५ धावांच्या जोरावर मुंबईला पहिल्या डावात १७३ धावांपर्यंत मजल मारता आली.

विनय कुमारने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मुंबईच्या पृथ्वी शॉला अवघ्या २ धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने जय बिश्ताला बाद केले. या दोघांनी नायरच्या हाती झेल दिला. त्यानंतर त्याने आकाश पारकरला पायचित करत यंदाच्या रणजी हंगामातील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. या आघाडीच्या फलंदाजांशिवाय अखिल हेरवाडकर (३२), सिद्धार्थ लाड (८) आणि कर्श कोठारी (१) या तिघांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

प्रत्युतरादाखल मैदानात उतरलेल्या कर्नाटकच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मात्र, शुभम दुबेने सलामीची जोडी फोडून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर रवी कुमार समर्थ ४० धावा करुन बाद झाला. त्यानंतर मयांक अगरवालने अर्धशतकी खेळी केली.