मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी उदयोन्मुख २२ वर्षीय फलंदाज सर्फराज खानने झुंजार त्रिशतक झळकावलं. महत्वाचं म्हणजे, मागील काही दिवसांपासून सर्फराज आजारी आहे. रात्री सर्फराज तापानं फणफणत होता. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्फराजनं सेहवागच्या स्टाइलनं फलंदाजी करत त्रिशतकं झळकावलं. सामन्यानंतर बोलताना सर्फराज म्हणाला की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी प्रकृती बिघडली आहे. परंतु मला माझ्या खेळावर विश्वास होता. मी खेळपट्टीवर ठाण मांडल्यास संघाला नक्कीच सावरू शकतो, याची जाणीव होती. त्यामुळेच त्रिशतकी खेळी साकारू शकलो.

यंदाच्या रणजी हंगामातील हे तिसरे त्रिशतक ठरले आहे. बंगालच्या मनोज तिवारी आणि मिझोरामच्या तरुवर कोहली यांनीसुद्धा या हंगामात त्रिशतके झळकावली आहेत. तसेच मुंबईकडून रणजी स्पर्धेत त्रिशतक झळकावणारा सर्फराज हा सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी अजित वाडेकर, सुनील गावस्कर, विजय र्मचट, संजय मांजरेकर, वसिम जाफर आणि रोहित शर्मा या सहा जणांनी अशी किमया साधली होती.

एलिट ‘ब’ गटातील या लढतीत उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावातील ६२५ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने चौथ्या दिवशी ७ बाद ६८८ धावांवर डाव घोषित केला. पंचांनी सामना अनिर्णित झाल्याचे जाहीर करत मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण बहाल केले. ३० चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ३०१ धावा फटकावणारा सर्फराज सामनावीर ठरला. सोमवारपासून मुंबईचा हिमाचल प्रदेशविरुद्ध सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशकडूनच खेळणाऱ्या सर्फराजने त्यांच्याच विरुद्ध त्रिशतक झळकावल्यामुळे क्रीडाप्रेंमीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे.

सामन्यानंतर बोलताना मुंबई संघाचा कर्णधार आदित्य तरे यानेही सर्फराजच्या खेळीवर कौतुकांचा वर्षाव केला. तो म्हणाला की, ‘सर्फराज आपल्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे. त्याच्यात अफाट गुणवत्ता असून एक क्रिकेटपटू म्हणून तो परिपक्व होत आहे. त्याच्या त्रिशतकी खेळीमुळेच मुंबईला या सामन्यात तीन गुण मिळवता आले. सरावातही तो कठोर मेहनत घेत असतो. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सामना जिंकून देण्याची क्षमता सर्फराजमध्ये आहे.’