आयपीएलच्या १२ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावामध्ये युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने एक कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. युवराजचा मुंबई संघामध्ये समावेश झाल्याने आता रोहित शर्मा आणि युवराजची फलंदाजी एकाच वेळी पाहता येणार असल्याचा आनंद असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी सांगितले आहे. एकंदरीतच युवराजच्या क्रिकेट कारकिर्दीमधील ही शेवटची संधी असल्याचे बोलले जात असले तरी तो मुंबईकर झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. या आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचा ‘सिम्बा’ म्हणजेच रणवीर सिंगचाही समावेश आहे. त्याने स्वत: या संदर्भात ट्विट केले आहे.

रणवीर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. २८ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या सिम्बाच्या प्रमोशनसाठी तो अनेक शहरांचे दौरे करताना दिसत आहे. असे असतानाही तो आयपीएलच्या लिलावावर नजर ठेऊन होता असंच त्याने नुकतचं केलेलं एक ट्विट पाहिल्यावर म्हणता येईल. मुंबई इंडियन्सने युवराजला संघात घेतल्याचे ट्विट केल्यानंतर रणवीरचे ते ट्विट कोट करुन रिट्वीट केले आहे. आपल्या कोटेड ट्विटमध्ये त्याने केवळ ‘ओह येईईई…’ असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

क्रिकेट आणि रणवीर

रणवीरला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. याबद्दल त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी सांगितले आहे. अनेक आयपीएल सामन्यांमध्ये तो मैदानात आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देताना दिसला आहे. रणवीर हा मुंबई इंडियन्स संघाचा पाठीराखा आहे. तर दुसरीकडे त्याला एम. एस. धोनीही प्रचंड आवडतो. त्याने अनेकदा धोनी समोर आल्यावर आपण फॅनबॉय होऊन जातो असं म्हटलंही आहे. २०१७ मध्ये मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद जिंकल्यानंतर वांद्रे-वरळी सी लिंकवर सेलिब्रेशन करुन त्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये सहभागी होत थेट २०१८चे जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईच्या संघालाही चॅम्पियन्स म्हणत त्याने ट्विट केले होते. कपिल देव यांच्या कारकिर्दीवर आधारित ८३ या सिनेमामध्ये रणवीर कपिल यांची भूमिका साकारणार आहे. सामान्य भारतीय क्रिकेट चाहत्यांप्रमाणे रणवीरही क्रिकेट वेडा असल्याने आगामी आयपीएलच्या हंगामामध्ये तो पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसेल.