भारताचा गोल्फपटू रणवीर सैनीने लॉस एंजलिस येथे सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शारीरिक अपंगत्व असलेल्या विशेष खेळाडूंसाठी दरवर्षी ‘स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा’ घेतली जाते. ऑटिझमग्रस्त असलेल्या १४ वर्षांच्या रणवीरने जीएफ गोल्फ लेवल-२ अल्टरनेट शॉट सांघिक प्रकारात ही कामगिरी करून दाखविली. यापूर्वीही रणवीर सैनीने आशियाई पॅसिफिक जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ऑटिझमच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या रणवीरने नऊ वर्षांचा असल्यापासून गोल्फ खेळण्यास सुरूवात केली होती.