आशियाई सुवर्णपदक विजेती पिंकी प्रामाणिक ही स्त्री नसून पुरूष आहे, असे वैद्यकीय तपासणीच्या अंतिम अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आज पोलिसांना सादर करण्यात आला आहे. पिंकी प्रामाणिकने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप तिच्या समवेतराहणाऱ्या एका महिलेने केला होता. त्यानंतर पिंकीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोलकाता येथील एसएसकेएम या सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने पिंकीची लैंगिक चाचणी केली होती. सध्या पिंकी जामिनावर सुटलेली आहे. तिच्याविरोधात पोलिसांनी बलात्कार, फसवणूक व धमक्या देणे असे आरोप ठेवले आहेत.
पिंकी हिच्यासोबत राहणाऱ्या महिलेने असा आरोप केला होता की, पिंकी पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर १४ जूनला पिंकीला अटक करण्यात आली व तिची लिंगनिश्चिती करण्यासाठी वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले.
पिंकी प्रामाणिक हिने २००६ मध्ये दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. तिची ११ जुलै रोजी जामिनावर सुटका करण्यात आली होती. पिंकीचे यापूर्वीचे लैंगिक चाचणी अहवाल निर्णायक नव्हते व त्या चाचण्या बरसात येथील खासगी रूग्णालयांनी केलेल्या होत्या. त्यानंतर बरसात सरकारी रूग्णालयातही तिच्या चाचण्या केल्या गेल्या. एसएसकेएम रूग्णालयाकडे हे प्रकरण आल्यानंतर तेथेही गुणसूत्र चाचणीची सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेवटी ही तपासणी हैदराबाद येथे करण्यात आली. ज्या पद्धतीने तिची लैंगिक चाचणी घेण्यात आली त्यामुळे लैंगिक असमानतेच्या मुद्दय़ावरून बरीच टीका झाली होती. तिला त्या वेळी अटक करून तुरूंगात टाकण्यात आले होते.