देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु असलेल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात राशिद खानने हॅटट्रीकची नोंद करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ४ चेंडूवर ४ बळी घेणारा राशिद खान दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने अशी कामगिरी केली आहे. राशिदने तिसऱ्या टी-२० सामन्यात ओब्रायन, डॉक्रेल, गेटकेट आणि सिमी सिंह यांना माघारी धाडलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना अफगाणिस्तानने २१० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या केविन ओब्रायनने ७४ धावांची खेळी करत अफगाणिस्तानला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र २० षटकांत आयर्लंडचा संघ १७८ धावांपर्यंत मजल मारु शकला. राशिद खानने आयर्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला.