देहरादूनमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात आयर्लंडवर मात करुन अफगाणिस्तानच्या संघाने, आपल्या पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली आहे. चौथ्या डावात अफगाणिस्तानला देण्यात आलेले १४७ धावांचे आव्हान त्यांनी ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रहमत शाह (७६) आणि इहसनुल्लाह (नाबाद ६५) यांच्या १३९ धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला. ७ गडी राखून मिळवलेल्या या विजयात अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे.

कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये ५ बळी मिळवण्याचा पराक्रम करणारा राशिद खान नववा गोलंदाज ठरला आहे. आयर्लंडच्या दुसऱ्या डावात राशिद खानने ८२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी टिपले. २० वर्षीय राशिद खान या नऊ गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.

आयर्लंडच्या पहिल्या डावात केवळ १७२ धावा झाल्या. या डावात ११ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या टीम मूर्ताघ याने अर्धशतकी (नाबाद ५४) खेळी केली. तर दुसऱ्या डावात टीमने २७ धावा केल्या. आयर्लंडने दुसऱ्या डावात २८८ धावा केल्या. आयर्लंडचे ७ फलंदाज तर दुहेरी धावसंख्यादेखील गाठू शकले नाहीत. अहमदझाई आणि मोहम्मद नबी यांनी ३-३ बळी टिपले. अफगाणिस्तानचा पहिला डाव ३१४ धावांत आटोपला. त्यांच्याकडून रहमत शाहने सर्वाधिक ९८ धावा केल्या. पण २ धावांसाठी त्याचे शतक हुकले.