फिरकी गोलंदाज रशीद खानकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर विश्वचषक क्रिकेट स्पध्रेअगोदर कर्णधारपदावरून वगळण्यात आलेल्या असगर अफगाणकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचे नेतृत्व एकाच व्यक्तीकडे सोपवले असून, अंमलबजावणी होण्यापूर्वीच नेतृत्वाची विभागणी टाळली आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी रेहमात शाह, गुलबदिन नैब आणि रशीद यांच्याकडे अनुक्रमे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकाराचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी नैबच्या निवडीबाबत आश्चर्य प्रकट करण्यात आले होते.

रशीदकडे दोन कसोटी, ६८ एकदिवसीय आणि ३८ ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. विश्वचषक स्पध्रेत अफगाणिस्तानने भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या सामन्यांत निसटते पराभव पत्करले. साखळीमधील नऊ सामन्यांत एकही विजय मिळवू न शकणाऱ्या या संघाला १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. विश्वचषकासाठीच्या संघ निवडीत असगरला वगळल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये छाप पाडणाऱ्या रशीद आणि गुलबदिन नैब यांनी नाराजी प्रकट केली होती.