आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशीद खानने सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. विराट, एबी डेव्हिलिअर्स आणि धोनीची विकेट मिळवत रशीदने भारतीयांनाही आपल्या गोलंदाजीचा चाहता बनवलं आहे. अफगाणिस्तानातही रशीद खानची प्रसिद्धी प्रचंड वाढली असून यासाठी सचिन तेंडुलकरचं एक ट्विट कारणीभूत ठरलं आहे. सचिन तेंडुलकरच्या एका ट्विटमुळे रशीद अफगाणिस्तानात सुपरहिट ठरला आहे. त्याची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, प्रसिद्धीच्या बाबतीत राष्ट्राध्यक्षांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आपण असल्याचं रशीद सांगू लागला आहे.

त्याचं झालं असं की, उपांत्य फेरीत रशीद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात केलेल्या कामगिरीचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केलं होतं. टी-२० मधील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज असल्याची पावती सचिन तेंडुलकरने रशीदला दिली. सचिन तेंडुलकरने केलेल्या या कौतुकामुळे रशीद खान अफगाणिस्तानात प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.

रशीद खानला सचिनने ट्विट करत आपलं कौतुक केल्याचं माहितीही नव्हतं. रशीदने सांगितल्यानुसार, सामना संपल्यानंतर मी बसमध्ये बसलो असताना एका मित्राने मला सचिनच्या ट्विटचा स्कीनशॉट पाठवला. तो स्क्रीनशॉट पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. उत्तर देण्याआधी जवळपास एक ते दोन तास मी फक्त विचार करत होतो. काय लिहावं हेच मला कळत नव्हतं. पण अखेर मी उत्तर दिलं”.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “मला नेहमीच रशीद चांगला फिरकी गोलंदाज आहे असं वाटत होतं, आणि आता टी-२० फॉरमॅटमधील तो सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे असं म्हणताना मला संकोच नाही. त्याच्याकडे फंलदाजी कौशल्यही आहे”.

“अफगाणिस्तानातील सर्व लोकांनी सचिन तेंडुलकरचं हे ट्विट पाहिलं असावं. अफगाणिस्तानात सचिन तेंडुलकर प्रचंड प्रसिद्ध असून त्याने माझं कौतुक केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अशाप्रकारे कौतुक केल्याने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळते”, असं रशीद खानने सांगितलं आहे.

रशीद खान आयपीएलमध्ये खेळत असल्या कारणाने तेथील लोकांना आणि त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटला महत्व मिळत असून रशीद खानने यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतात क्रिकेटर्सना जितकं महत्व आणि प्रसिद्धी मिळते तितकं अफगाणिस्तानात मिळतं का ? असं विचारलं असता, “जिथपर्यंत मला माहिती आहे राष्ट्राध्यक्षांनंतर सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली व्यक्ती मीच आहे’, असं आता तो अभिमानाने सांगतो.