08 July 2020

News Flash

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : मुंबईला नमवून रत्नागिरी प्रथमच ‘अजिंक्य’

मुंबई शहरवर निसटता विजय मिळवत पुण्याला महिला गटातील २३वे विजेतेपद

(संग्रहित छायाचित्र)

यजमान रत्नागिरीने रोमहर्षक लढतीत मुंबई शहरचा ३१-२८ असा पराभव करून ६७व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच पुरुषांचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर महिलांमध्ये पुण्याने मुंबई शहरवर २२-२० असा निसटता विजय मिळवत सर्वाधिक २३व्या जेतेपदाला गवसणी घातली.

पवन तलाव मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि दीपिका जोसेफे यांची उणीव पुण्याला अजिबात भासली नाही. आम्रपाली गलांडेच्या एकीकडे पकडी होत असताना अंकिता जगताप, मानसी सावंत आणि पूजा शेलार यांनी पहिल्या सत्रात पुण्याला १५-९ अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता होती. परंतु दुसऱ्या सत्रात पूजा यादव आणि मेघा कदमच्या दमदार चढाया तसेच तेजस्विनी पोटे आणि पौर्णिमा जेधेच्या दिमाखदार पकडींच्या बळावर मुंबईने सामन्यातील रंगत वाढवली. पण पुण्याने आपले जेतेपद निसटू दिले नाही.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून चुरस होती. रत्नागिरीच्या अजिंक्य पवार वरिष्ठ आणि अजिंक्य पवार कनिष्ठ यांच्या आक्रमक चढायांना मुंबईकडून पंकज मोहिते आणि सुशांत साईल यांच्या चढायांचे चोख प्रत्युत्तर लाभले. परंतु प्रेक्षकांच्या व्यत्ययानंतर सामन्याचे चित्र पालटले आणि रत्नागिरीने सामन्याचे नियंत्रण मिळवताना मध्यांतराला १९-९ अशी आघाडी मिळवली. परंतु दुसऱ्या सत्रात मुंबईने वेगाने गुण घेत सामन्यात चुरस निर्माण केली. पण रत्नागिरीने तीन गुणांच्या फरकाने सामना जिंकत विजयाचा जल्लोष साजरा केला. रत्नागिरीला २००९ आणि २०११मध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सामन्यात अडथळा

रविवारी राज्य अजिंक्यपदाचे अंतिम सामने पाहण्यासाठी २० हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहिले होते. आधीच दिरंगाईने सुरू झालेला पुरुषांच्या अंतिम सामन्यात ७-५ अशी गुणसंख्या असताना प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सामना स्थागित करण्याची पाळी संयोजकांवर आली. क्षमतेहून अधिक झालेल्या प्रेक्षकांनी मैदानांवर बसलेले प्रेक्षक उभे राहिल्यामुळे  बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामना अर्धा तास थांबवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 12:33 am

Web Title: ratnagiri first time win after beating mumbai abn 97
Next Stories
1 इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू मार्टिन पीटर्स यांचे निधन
2 Video : मुंबईकर शार्दुल ठाकूर ठरला टीम इंडियाचा तारणहार, फटकेबाजीने सामना फिरवला
3 IND vs WI : …आणि केवळ १० धावांनी रोहितचा अनोखा विक्रम हुकला
Just Now!
X