बंगळुरूच्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी १२ऐवजी १३ खेळाडू पाठवणाऱ्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची मनमानी सलामीच्या सामन्यापूर्वीच स्पष्ट झाली. मग संघावरील कारवाईची नाचक्की टाळण्यासाठी रत्नागिरीच्या ललिता घरतचा बळी देण्यात आला. याबाबत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनने आक्रमक पवित्रा स्वीकारला असला तरी ललिता परतल्यावरच आम्ही भूमिका ठरवू, असे सांगितले.
‘‘ललिता स्पर्धा संपल्यावर जेव्हा परतेल, तेव्हा आम्ही राष्ट्रीय स्पर्धा आणि राज्य निवड प्रक्रियेत नेमके काय घडले, याची माहिती घेऊ. तिची वैद्यकीय चाचणीसुद्धा झाली होती. मग कार्यकारिणी समितीची बैठक घेऊन या अन्यायाविरोधात कसा लढा द्यायचा, याची रूपरेषा ठरवू,’’ असे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कदम आणि प्रमुख कार्यवाह विलास शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडताना निवड समितीने आधी अभिलाषा म्हात्रेला डावलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तिला १६वी खेळाडू म्हणून विशेष शिबिरासाठी थांबवण्यात आले. अखेर अभिलाषाला संघात स्थान देण्यासाठी बंगळुरूला १३ खेळाडूंचा पाठवण्यात आला. मात्र राष्ट्रीय स्पध्रेसाठी १२ खेळाडूंचा संघ लागतो. त्यामुळे १३वा खेळाडू कोण ठरणार, हा पेच संघासमोर उभा राहिला. महाराष्ट्राच्या संघातून पूजा शेलारला १३वी खेळाडू ठरवण्याचा डाव होता. मात्र तो अयशस्वी ठरल्यामुळे अखेर प्रशिक्षकांनी विनंती करून ललिता घरतला १३वी खेळाडू ठरवून राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आले. या घटनेचे कबड्डी क्षेत्रात तीव्रपणे पडसाद उमटत आहेत.