आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या जसप्रीत बुमराहने फार कमी कालावधीत भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलं. आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर बुमराहला २०१६ साली भारतीय संघात संधी मिळाली. मात्र सुरुवातीची काही वर्ष बुमराह प्रामुख्याने वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळायचा. २०१८ मध्ये घरच्या मैदानावर खेळत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत बुमराहने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. भारतीय कसोटी संघात बुमराहला संधी मिळण्यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा मोठा वाटा होता. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

२०१७ च्या अखेरीस बुमराह अंदाजे ३२ टी-२० आणि ३१ वन-डे सामने खेळला होता. त्याच्या शैलीमुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये टिकू शकेल का अशी शंका सुरुवातीला काही जणांनी व्यक्त केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेदरम्यान रवी शास्त्रींनी मला बुमराहला फोन करुन कसोटी क्रिकेटसाठी तयार रहा असं सांगायला सांगितलं. भारत अरुण Sportskeeda संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. “आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी कोलकात्यातला सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांना असं वाटलं की बुमराह कसोटीमध्ये उपयोगी ठरु शकेल. त्याच्या कामगिरीवर रवी शास्त्री खुश होते. त्यांनी मला बुमराहला फोन करुन कसोटी संघात खेळण्यासाठी तयार राहण्याबद्दल सांगायला सांगितलं.”

ज्यावेळी मी बुमराहशी याविषयी बोललो, त्यावेळी त्याने आपण तयार असल्याचं सांगितलं. कसोटी क्रिकेट खेळणं हे इतरांप्रमाणे माझंही स्वप्न असल्याचं बुमराह म्हणाला. कसोटीत गोलंदाजी करण्यासाठी जे-जे प्रयत्न करायला लागतील ते करायला मी तयार असल्याचंही बुमराहने माझ्याशी बोलताना सांगितलं, अरुण बुमराहच्या कसोटी पदार्पणाबद्दल बोलत होते. यानंतर बुमराह आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून खेळला. १४ कसोटी सामन्यात बुमराहने ६८ बळी घेत आपण कसोटी क्रिकेटमध्येही तितकीच चांगली कामगिरी करु शकतो हे दाखवलं.