दुखापतीमुळे बजरंगला रौप्य; करन, नरसिंह यांना कांस्यपदक

अल्माटी : भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने शनिवारी सलग दुसऱ्या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या.

पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला ९-४ असे पराभूत केले. गतवर्षी रवीने जपानच्या युटो ताकेशिटाला नमवून सुवर्णपदक मिळवले होते.

बजरंगकडून भारताला दिवसातील दुसऱ्या सुवर्णाची अपेक्षा होती. परंतु उजव्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे बजरंगने ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून माघार घेतली. त्यामुळे जपानच्या ताकुटो ओटोगोरोला जेतेपद बहाल करण्यात आले.

करनने ७० किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या सेनबोंग लीला ३-१ असे हरवले. नरसिंहने इराणच्या अहमद अल बुरीला ८-२ अशी धूळ चारून कांस्यपदक मिळवले. भारताने सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जमा आहेत.