भारताचा कुस्तीपटू रवी कुमारने ब्राझीलमधील साल्वाडोर डे बाहिआ येथे सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेत ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. रवीच्या या कामगिरीमुळे भारताचे स्पध्रेतील पदकाचे खाते उघडले. संपूर्ण स्पध्रेत दमदार कामगिरी करणाऱ्या रवीला अंतिम लढतीत अझरबैजानच्या माहिर आमीरास्लानोव्हने ०-१० असे चीतपट केले.
आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पध्रेतील विजेत्या रवीने जागतिक स्पध्रेत अमेरिकेच्या स्टीव्हन मिसीकचा १२-८ असा पराभव करून दणक्यात सुरुवात केली. २-८ अशा पिछाडीवरून रवीने हा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात त्याने कॅनडाच्या सॅम्युएल जॅगासवर ९-५ अशी कुरघोडी केली. उपांत्य फेरीत रवीने ०-८ अशा पिछाडीवरून जबरदस्त खेळ करताना मंगोलियाच्या जानाबाझार झादांबुंदवर ९-८ असा आश्चर्यकारक विजय साजरा केला. मात्र, अंतिम फेरीत त्याचा हा विजयरथ आमीरास्लानोव्हाने रोखला . ‘‘रौप्यपदक जिंकल्याचा आनंद होत आहे, परंतु या स्पध्रेत येण्यापूर्वी सुवर्णपदक हे लक्ष्य होते. त्यामुळे अंतिम फेरीत पराभूत झाल्याने थोडा दु:खी आहे. मात्र, हा शेवट नाही, खेळात सातत्य राखल्यास अधिक सुवर्णपदक जिंकणे शक्य होईल,’’ अशी प्रतिक्रिया रवीने दिली. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांनी रवी कुमारचे अभिनंदन केले.