पहिल्या कसोटीचा तीन दिवसांत फन्ना उडाला. टर्निंग विकेट असल्याने प्रत्येक चेंडूवर काहीतरी घडत होते. पुजारा आणि मुरली विजयने अशा विकेटवर हलक्या हातांनी फलंदाजी कशी करावी, याचा वस्तुपाठ घालून दिला. मुरली विजय सर्व खेळपट्यांवर आरामात खेळतो आणि त्याचा वेगळा क्लास दाखवून देतो. हाय वेवर गाडी स्थिर झाली की आपण जसे हलकेच स्टिअरिंग पकडतो आणि गाडी आपोआप चालत राहाते, तसा विजय हलक्या हातांनी बॅट पकडून चेंडूला बॅटला येऊन भेटू देतो. आफ्रिका, इंग्लंडच्या स्विंगिंग विकेट्स काय किंवा ऑस्ट्रेलियाच्या बाउंसी विकेट्स आणि उपखंडातल्या टर्निंग विकेट्स विजयने सगळीकडे आपला ठसा उमटवून आपला दर्जा सिद्ध केला आहे. पुजारा सौराष्ट्राचा असूनही मुंबईच्या विद्यापीठाची खडूस बॅटिंग करतो. या विकेटवर पूजाराच्या दुसऱ्या डावातल्या ७७ धावा म्हणजे ७७ किलो सोनेच आफ्रिकेला जास्त काळजी करावी लागेल कारण त्यांचे चांगले फलंदाज टर्नमुळे नाही तर हवेत गंडले. डूप्लेसि, अमला, डीविलयर्स फ्लाइटवर आऊट झाले. जडेजाच्या सरळ चेंडूचे नवे गूढ़ आफ्रिकेची झोप उडवणार असं दिसतय. एकाच अॅक्शनने चेंडू बाहेर जातो आणि आत येतो. अमला आणि डूप्लेसिचा जडेजाने सॉलिड मामा केला. अशा विकेट वर जो अधिक चांगली फलंदाजी करेल तो जिंकणार हा समज चुकीचा आहे. उलट ज्याचे स्पिनर्स अधिक चांगले तो जिंकणार. हो हो अगदी टर्निंग आखाडा असला तरी स्पिनर्सची गुणवत्ताच् निकाल ठरवणार. एखाद्या फलंदाजाचे तंत्र, एकाग्रता, सबुरी कितीही उत्तम असले, तरी अशा आखाड्यावर भल्यामोठ्या धावसंख्येची अपेक्षा करणं चूकच. चेंडूंचा फणा कधी डसेल सांगता येत नाही. त्यामुळे खरा सामना एका संघाचे गोलंदाज विरुद्ध दुसऱ्याचे गोलंदाज असाच असतो. भारतीय गोलंदाज भारी पडले कारण अश्विन आणि जडेजा अधिक वेगाने चेंडू रिलीज करतात म्हणून. त्यामुळे टर्न आणि बाउंस जास्त मिळाला. या उलट आफ्रिकेचे गोलंदाज हळू लोंबते चेंडू टाकत होते. इथे २०१२ ची इंग्लंड विरुद्ध भारत सीरिज आठवतीये. स्वान आणि पानेसरने चेंडू जास्त गतीनी रिलीज करून अश्विन आणि ओझावर मात केली आणि इंग्लंडला भारतात सिरीज जिंकून दिली. ओझाने टाकलेले हळू लोंबते चेंडू विकेट काढू शकले नाहीत. त्यातून धडा घेऊन अखेर शेवटच्या कसोटीत जडेजा आणि चावलाला घ्यावे लागले. पण तोपर्यंत सीरीज गेली होती.
मोहालीच्या या कसोटीत भारताची गोलंदाजी वरचढ होती म्हणून आपण जिंकलो. पुढील कसोटीत आफ्रिका धोरण बदलून वेगवान आणि अतिवेगवान गोलंदाजीची मात्रा वापरु शकते.
राहिला प्रश्न खेळपट्टीचा. कोहलीने खेळपट्टीचे केलेले समर्थन योग्यच आहे. आफ्रिकेतील पहिल्या षटकापासून वेडेवाकडे उसळणारे आणि डोक्यावर, खांद्यावर धडकणारे चेंडू, हातभर स्विंग होणारे चेंडू अशा खेळपट्ट्यांना स्पोर्टिंग विकेट म्हणले जाते तर टर्निंग ट्रॅक्सवर फलंदाजी येणे हा सुद्धा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. ज्या क्रिकेटच्या उदारमतवाद्याना ही असहिष्णुता वाटते त्यांनी आपले पुरस्कार अवश्य परत करावेत!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com