केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा कारभार सांभाळण्यास मनाई करण्याचा निर्णय शहर दिवाणी न्यायालयाने मंगळवारी घेतल्यानंतर मुंबई क्रिकेटवर्तुळातील घडामोडींनी आता वेग घेतला आहे. बुधवारी झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष रवी सावंत यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिवाणी न्यायालयाने पवारांना दणका दिला होता. या निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने एमसीएला आठवडाभराची मुदत दिली असून तोपर्यंत निर्णय स्थगित राहणार आहे.
‘‘एमसीएने बुधवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सावंत यांच्याकडे सोपवली आहेत. मुंडे यांच्या याचिकेसंदर्भातील निकाल लागेपर्यंत अध्यक्षांच्या अनुपस्थितीत नियमित सभांचे सभापतीपद भूषवणे आणि दैनंदिन कारभार पाहण्यासाठी म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे,’’ असे एमसीएचे कोषाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सांगितले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी आपण दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपल्या अंतरिम आदेशाला आव्हान देता यावे, यासाठी दिवाणी न्यायालयाने सात दिवसांची मुदत दिली आहे. आम्ही उच्च न्यायालयात तिला आव्हान देणार आहोत.’’
वानखेडे स्टेडियमवर आपल्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी खेळून निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरचा एमसीएच्या वतीने ३ डिसेंबरला एक खास सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहे, अशी ग्वाही एमसीएच्या सूत्रांकडून देण्यात आली.