News Flash

रवी शास्त्रींची निवड सर्वानुमते नाहीच?

अखेरपर्यंत गांगुलीचा शास्त्रींच्या नावाला विरोध?

सचिन-लक्ष्मण ठाम राहिल्याने गांगुलीचा विरोध मावळला?

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पहिल्यांदा रवी शास्त्रींची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच बीसीसीआयने पत्रकार परिषद घेऊन शास्त्रींच्या नियुक्तीच्या वृत्ताचं खंडन केलं. सल्लागार समिती आणि बीसीसीआय निवडीवर अजुनही चर्चा करत असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी केलं. मात्र त्यानंतर लगेच काल रात्री बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांच्या नावाची पुन्हा एकदा अधिकृतरित्या घोषणा केली.

मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार रवी शास्त्रींची निवड ही सर्वानुमते झाली नसल्याचं समोर येतंय. मुंबईत झालेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम शास्त्री यांच्या नावाला आपली पसंती देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी सचिनने लक्ष्मणचं मनही वळवलं होतं. मात्र सौरव गांगुली रवी शास्त्रींऐवजी टॉम मूडी यांना प्रशिक्षकपद देण्यात उत्सुक होता.

वर्षभरापूर्वी झालेल्या निवड प्रक्रियेत सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. बँकॉकमध्ये सुट्टीवर असताना शास्त्रींनी प्रशिक्षकपदाची मुलाखत देण्याला गांगुलीचा विरोध होता. गांगुलीच्या मते मोठी जबाबदारी स्विकारताना शास्त्रींनी दाखवलेला अप्रोच योग्य नव्हता. त्यामुळे मागच्या वर्षी सल्लागार समितीने अनिल कुंबळेंना प्रशिक्षकपद दिलं होतं.

एक वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद मुंबईत झालेल्या बैठकीत यंदाही उमटले. रवी शास्त्रींकडे संघाची जबाबादारी द्यायला सौरव गांगुली यावेळीही तयार नव्हता, मात्र बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनीही संपूर्ण संघाला शास्त्रीच प्रशिक्षक म्हणून हवे असल्याचं सांगितलं. मात्र तरीही गांगुली शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब करायला तयार नव्हता. अखेर मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही व्ही.व्ही.एस लक्ष्मणने पुढाकार घेत रवी शास्त्रींच्या नावाला आपला पाठींबा दिल्याने गांगुलीला आपला विरोध मागे घ्यावा लागला.

यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कर्णधार विराट कोहलीच्या मागणीपुढे बीसीसीआय आणि क्रिकेट सल्लागार समिती झुकली असा संदेश जाऊ नये याकरता टॉम मूडी आणि विरेंद्र सेहवाग यांची नाव प्रसारमाध्यामांपुढे करण्यात आली. यामुळे नेमकं प्रशिक्षक कोण होणार याबाबत संभ्रम वाढला. त्यातच मध्ये रवी शास्त्रींच्या नावाची घोषणा करण्यात आली जी बीसीसीआयने नाकारली. अखेर रात्री उशीरा बीसीसीआयकडून पुन्हा एकदा अधिकृतपणे रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

रवी शास्त्री यांच्याप्रमाणे गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान यांच्या नावावरही एकमत झालं नसल्याचं समोर येतंय. रवी शास्त्रींना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून बी. अरुण हवे होते, मात्र सल्लागार समितीच्या सौरव गांगुलीने विराट कोहलीशी यासंदर्भात चर्चा केली असता कोहलीने जहीर खानच्या नावाला आपला काही आक्षेप नसल्याचं कळतंय. मात्र यावेळीही कोहलीने खेळाडूंचा कल हा बी.अरुण यांच्याकडेच असल्याचं सांगितलं.

कुंबळे आणि कोहली यांच्यातला वाद समोर आल्यानंतर बीसीसीआय सतत तोंडावर पडत आहे. याचसोबत जर सर्व निर्णय कोहली घेणार असेल तर क्रिकेट सल्लागार समितीची गरज काय असाही सूर काही माजी खेळाडूंनी लावला होता. त्यामुळे आता आगामी २ वर्षात चांगली कामगिरी करुन भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देण्याचं मोठं काम शास्त्री आणि कोहली यांच्याकडे असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 5:06 pm

Web Title: ravi shastri appointment as a head coach of indian cricket team was not unanimous says sources
Next Stories
1 मुंबईच्या चिमुरडीची ‘बुद्धी’बळावर सत्ता
2 सचिनच्या इंग्रजीची नेमबाज जॉयदीप कर्माकरकडून खिल्ली, चाहत्यांकडून जॉयदीपची धुलाई
3 रवी शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून छाप पाडलेल्या ५ घटना
Just Now!
X