News Flash

धोनी अजूनही संपलेला नाही -शास्त्री

 श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत धोनी हा सातत्याने धावा करत आहे.

| September 2, 2017 03:06 am

धोनी अजूनही संपलेला नाही -शास्त्री
महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्त्री (संग्रहित छायाचित्र)

एकीकडे भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी ‘धोनीला पर्याय असू शकतो,’ असे वक्तव्य केले होते. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीची कारकीर्द अजून अर्धीही झालेली नाही, असे सांगत धोनी अजून संपलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये २०१९मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या अभियानात तो एक संघाचा भाग असेल, असेही शास्त्री सांगायला विसरले नाहीत.

श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत धोनी हा सातत्याने धावा करत आहे. गेल्या लढतीत त्याने सामन्यांचे त्रिशतकही पूर्ण केले आहे. २०१९च्या विश्वचषकासाठी संघबांधणी करताना बरेच पर्याय आजमावले जात असले तरी धोनीला अजूनही योग्य पर्याय संघ व्यवस्थापनाने शोधलेला नाही.

‘‘धोनीचा संघावर फार मोठा प्रभाव आहे. तो एक महान क्रिकेटपटू आहे. संघासाठी तो एक हिरा आहे. काही जण त्याची कारकीर्द संपुष्टात आली असे म्हणत असले तरी त्याचा क्रिकेटचा अर्धा प्रवासही झालेला नाही. जर कुणाला धोनीची कारकीर्द संपुष्टात आली असे वाटत असेल तर त्यांची ही सर्वात मोठी चूक ठरेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

धोनी हा भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, अशी त्याची स्तुती शास्त्री यांनी केली आहे. ते याबाबत म्हणाले की, ‘‘धोनी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील देशाचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याच्या फलंदाजीच्या आकडेवारीकडे पाहूदेखील नका, अजून तुम्हाला काय हवे. त्याने आतापर्यंत क्रिकेट खेळत आहे, म्हणून त्याचा पर्यायी विचार करायचा का? तुम्ही सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा ३६व्या वर्षी पर्याय म्हणून विचार करू शकता का? धोनी अजूनही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो सध्याच्या घडीला भारतातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.’’

आगामी विश्वचषकासाठी संघाची निवड करताना काही प्रयोग केले जात आहेत. याबद्दल शास्त्री म्हणाले की, ‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापुढेही प्रयोग केले जातील. आम्ही सामना जिंकू किंवा पराभूत होऊ, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे नाही. तुम्ही प्रत्येक वेळी जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असतो. पण विजयासाठी आवश्यक असलेला समन्वयही महत्वाचा असतो. हा समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. आगामी विश्वचषकापर्यंत हे प्रयोग भारतीय संघात सुरूच राहतील.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:06 am

Web Title: ravi shastri comment on mahendra singh dhoni
Next Stories
1 भारताविरुद्धच्या मालिकेनंतर कारकीर्दीचा विचार करणार -मलिंगा
2 फुटबॉलच्या पंढरीतील विश्वचषकाचा प्रो कबड्डीला ‘खो’
3 Pro Kabaddi Season 5 – पाटणाची हाराकिरी बंगालच्या पथ्यावर, घरच्या मैदानावर पहिला विजय
Just Now!
X