मायदेशात भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. पण आगामी १८ महिन्यांमध्ये भारतीय संघाचा खरा कस लागेल. सध्या दक्षिण आफ्रिकेचा दौरा हे आमच्यापुढील आव्हान आहे. या दौऱ्यासाठी भारताचा वेगवान मारा चांगला आहे, पण या दौऱ्यात फलंदाजी महत्त्वाची ठरेल, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

भारताने आपल्या मैदानात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका यांना गेल्या काही महिन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. पण आगामी १८ महिन्यांमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हे दौरे भारतासाठी आव्हानात्मक असतील आणि यामध्ये हा संघ कितपत मजल मारू शकतो, हे साऱ्यांना पाहता येईल.

‘भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे या संघाला ऐतिहासिक विजयाची संधी आहे. या संघामध्ये चांगले वेगवान गोलंदाज आहेत. त्याचबरोबर राखीव गोलंदाजांमध्येही चांगली गुणवत्ता आहे. तुम्ही कितीही धावा केल्या तरी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करणे महत्त्वाचे असते. परदेशातील खेळपट्टय़ांवर २० बळी मिळवण्याची त्यांची कुवत आहे. त्याचबरोबर संघात चांगले अष्टपैलू खेळाडूही आहेत, ते संघााठी उपयुक्त ठरतील. या संघातील खेळाडूंनी जर लौकिकाला साजेसा खेळ केला तर ते नक्कीच परदेशातही विजय मिळवू शकतात,’ असे शास्त्री यांनी सांगितले.

पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत शास्त्री म्हणाले की, ‘‘या दौऱ्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांतील खरी कसोटी असेल. कारण दोन्ही संघांकडे चांगला वेगवान मारा आहे. पण या गोलंदाजांचा सामना फलंदाज कसे करतात, हे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असेल. कारण खेळपट्टय़ा जर वेगवान गोलंदाजीला पोषक असतील तर फलंदाज किती काळ तग धरून राहतात, हे महत्त्वाचे ठरते. या दौऱ्यात नक्कीच चंगली चुरस पाहायला मिळेल.’’

फलंदाजीत वैविध्य

भारतीय फलंदाजीमध्ये तुम्हाला वैविध्य पाहायला मिळेल. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. लोकेश राहुलकडे चांगली गुणवत्ता आहे. त्याचबरोबर अन्य फलंदाजांकडे गुणवत्तेबरोबर चांगला अनुभवही आहे. त्यांच्या फलंदाजीतली विविधता हे भारताचे बलस्थान आहे, असे शास्त्री म्हणाले.

अजिंक्यला प्रशिक्षणाची गरज नाही

अजिंक्य रहाणेसारखा निष्णात फलंदाज भारताच्या ताफ्यात आहे. सध्या त्याचा फॉर्म चांगला नसला तरी या स्तरावर त्याला प्रशिक्षणाची नक्कीच गरज नाही. त्याचे फलंदाजीचे तंत्र उत्तम आहे, ते बदण्याचीही गरज नाही. तो मानसिकरीत्या खचलेला आहे, असेही नाही. तो फक्त काही काळ खेळपट्टीवर राहिला तर तो पुन्हा पूर्वीसारखी नेत्रदीपक फलंदाजी करू शकेल, असे शास्त्री यांनी सांगितले.

अश्विन-जडेजा यांच्यात निवड करणे अवघड

आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा, हे सध्याच्या घडीला जगातील अव्वल गोलंदाजामध्ये गणले जातात. या दौऱ्यात आम्ही तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांबरोबर मैदानात उतरणार आहोत. गेल्या दौऱ्यात या दोघांना जास्त संधी मिळाली नव्हती. पण जर या दोघांपैकी एकाची निवड करायची झाली, तर ते सर्वात अवघड काम असेल, असे शास्त्री यांनी सांगितले.