मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या पदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) २००० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. मात्र टॉम मूडी, गॅरी कर्स्टन, माइक हेसन, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग यांसारख्या माजी खेळाडूंचा अपवाद वगळता कोणतीही मोठी नावे या पदासाठी उत्सुक नसल्यामुळे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाच पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासह गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले असले तरी या प्रक्रियेत शास्त्री यांना थेट स्थान मिळणार आहे. शास्त्री यांना २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. त्यांची कामगिरी पाहता, भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संघातील अनेक खेळाडूंनी शास्त्री यांनाच पाठिंबा दर्शवला आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली असून टॉम मूडी हेच बीसीसीआयने आखलेल्या निकषात मोडत आहेत. मूडी हे सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे संचालक असून त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. २००७मध्ये त्यांनी श्रीलंका या राष्ट्रीय संघाला अखेरचे मार्गदर्शन केले होते.

त्याशिवाय, मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे तब्बल २००० अर्ज आल्याची माहिती मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन, भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांच्यासह अनेक जण या पदासाठी रिंगणात आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेसुद्धा भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी उत्सुक होता, मात्र त्याने अद्याप आपला अर्ज बीसीसीआयकडे पाठवलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होडस याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

भारत अरुण यांचेही स्थान कायम

गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अनेक जण उत्सुक असले तरी विद्यमान प्रशिक्षक भारत अरुण हेच पुढील दोन वर्षांसाठी आपले स्थान कायम राखणार, अशी चर्चा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने मर्यादित षटकांच्या तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. सध्याचा भारताचा गोलंदाजीचा मारा हा जगात सर्वोत्तम मानला जात आहे. त्याचबरोबर अरुण हे शास्त्री यांच्या खास मर्जीतले आहेत.

गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी वेंकटेश प्रसादचा अर्ज

भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद हा गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असल्याचे समजते. प्रसाद यांनी यापूर्वी २००७ ते २००९ या कालावधीत भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर ते आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (चार वर्षे) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (दोन वर्षे) या संघांचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.