रवी शास्त्री आशावादी

भारताचा सर्वाधिक अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीने २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्वत:ला पूर्णपणे सज्ज करण्याची खूणगाठ मनाशी बांधली, तर त्याला कोणीही अडवू शकणार नाही, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने पराभव पत्करल्यापासून ३८ वर्षीय धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शास्त्री यांनाही धोनीच्या भवितव्याविषयी प्रश्न विचारण्यात आले.

‘‘धोनी हा एक महान खेळाडू आहे. तो स्वत:ला भारतीय संघावर कधीच लादणार नाही. त्याउलट संघात स्थान मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यायची आहे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असली तरी ‘आयपीएल’मध्ये तो नक्कीच खेळेल,’’ असे शास्त्री म्हणाले.

‘‘धोनीला जवळपास १५-१६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्याने जर स्वत: पुनरागमन करायचे ठरवले, तर कोणीही त्याला रोखू शकत नाही. मग तो थेट ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवूनच समाधानी होईल. त्यामुळे ‘आयपीएल’मधील त्याची कामगिरी फार निर्णायक असेल,’’ असेही ५७ वर्षीय शास्त्री यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान धोनीने किमान जानेवारीपर्यंत त्याच्या पुनरागमनाविषयी प्रश्न विचारू नये, असे स्पष्ट केले होते. परंतु विश्वचषकाला १० महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाही युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे. त्यामुळेच चाहते धोनीने लवकरात लवकर पुनरागमन करावे, अशी मागणी करत आहेत. त्याचप्रमाणे पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही संघ व्यवस्थापन अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देत नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.