भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा समाजमाध्यमांवर जोरदार रंगली असली, तरी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ती फेटाळून लावली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर धोनीने चेंडू मागून घेतला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला बहर आला होता. मात्र धोनीच्या निवृत्तीची चर्चा निर्थक असल्याचे स्पष्टीकरण शास्त्री यांनी दिले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१४मध्ये झालेला कसोटी सामना संपल्यानंतर धोनीने सामन्याची यष्टी पंचांकडून मागून घेतली होती. त्यानंतर आश्चर्यकारक पद्धतीने त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. याचाच संबंध तिसऱ्या एकदिवसीय सामन्याशी जोडला जात आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर आठ विकेट राखून विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. हा सामना संपल्यानंतर खेळाडू पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना धोनी मात्र थांबला आणि पंच ब्रूस ऑक्झेनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि मायकेल गॉफ (इंग्लंड) यांच्याकडे चेंडूची मागणी केली.

गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला होता, असे शास्त्री यांनी सांगितले. धोनीच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळताना शास्त्री यांनी एका वाक्यात म्हटले की, ‘‘हे निर्थक आहे, धोनी कुठेच जात नाही.’’

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील फलंदाजीमुळे धोनीबाबत चर्चा सुरू आहे. लॉर्ड्सवरील दुसऱ्या सामन्यात धोनीने ५९ चेंडूंत ३७ धावा केल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर टीका झाली होती.

धोनीवर जर टीका होत असेल, तर तो ती सहनसुद्धा करू शकतो. मात्र संघातील त्याचे स्थान त्यामुळे तसूभरही कमी होणार नाही, असे स्पष्टीकरण शास्त्री यांनी दिले आहे. ते म्हणाले, ‘‘सध्या तरी ही सर्व चर्चा निर्थक आहे. धोनीला फक्त ४५ षटकांनंतर चेंडूचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अरुण यांना चेंडू दाखवायचा होता.’’