प्रशिक्षक रवी शास्त्री यांची स्पष्टोक्ती

परदेशात अनेक संघांची कामगिरी खराब होते. त्यामुळे परदेशातील कामगिरीबाबत फक्त भारतावर ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली आहे.

चालू वर्षांत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२ आणि इंग्लंडविरुद्ध १-४ अशा फरकाने परदेशातील दोन मालिका गमावल्या आहेत. या दोन्ही दौऱ्यांवर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून परदेशांमधील कामगिरी सुधारण्याची अपेक्षा केली जात होती.

ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे भारतासाठी किती महत्त्वाचे आहे, या प्रश्नाला उत्तर देताना शास्त्री म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या चुकांमधून बरेचसे शिकायचे असते. परदेशात उत्तम कामगिरी फार थोडय़ाच संघांना करता आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना काही काळ हे यश मिळवता आले आहे. मात्र हे अपवाद वगळता कोणत्याही संघांना परदेशात चांगली कामगिरी करता आलेली नाही. मग हा शिक्का फक्त भारतावरच का, मारला जात आहे.’’

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या गमावलेल्या मालिकांचे विश्लेषण करताना शास्त्री म्हणाले, ‘‘या मालिकांमधील काही सामने आम्ही थोडक्यात गमावले आहेत. हे सामने आम्हाला वाचवता आले असते, तर त्याचा मोठा फायदा आम्हाला झाला असता.’’

गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलिया संघाने आपला दर्जा गमावला आहे का, याबाबत शास्त्री यांनी सांगितले की, ‘‘मला असे वाटत नाही. उत्तम क्रीडा संस्कृती असलेले हे राष्ट्र आहे. याचप्रमाणे मायदेशात कोणताही संघ कमकुवत नसतो. त्यामुळे भारताच्या खेळाकडे लक्ष केंद्रित करणे आम्हाला अधिक योग्य वाटते.’’