प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून भारतीय कर्णधाराचे कौतुक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची गेल्या दशकभरातील प्रगती अतुलनीय असून २०२० मध्येही तो या कामगिरीत सातत्य राखेल, अशा शब्दांत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी कोहलीवर स्तुतिसुमने उधळली.

३१ वर्षीय कोहली सध्या ‘आयसीसी’च्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी आहे. २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कोहलीने गेल्या दशकभरात कसोटीत ७,२०२, एकदिवसीय सामन्यांत ११,१२५ आणि ट्वेन्टी-२० मध्ये २,६३३ धावा केल्या आहेत. त्यामुळेच शास्त्री यांच्या कौतुकात कोहली पात्र ठरला आहे.

‘‘कोहलीसाठी मला एकच शब्द उच्चारावासा वाटतो तो म्हणजे अतुलनीय. विशेषत: कसोटी सामन्यांत त्याने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. कसोटी हा क्रिकेटचा मूळ प्रकार असून कोहलीसारखे खेळाडू जेव्हा त्याचे महत्त्व समजतात, तेव्हा युवा पिढीही त्याकडे आपसूकच आकर्षित होते,’’ असे ५७ वर्षीय शास्त्री म्हणाले.

‘‘२०२० या वर्षांतसुद्धा कोहलीच्या प्रगतीचा आलेख उंचावलेलाच आपल्याला पाहायला मिळेल. संघहितासाठी आपल्याला नेमके काय करायचे आहे आणि आपण खेळपट्टीवर टिकून राहण्याची संघासाठी किती महत्त्वाचे आहे, याची त्याला पूर्ण जाणीव असल्यामुळेच तो सातत्याने यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.

‘‘कोहलीसारखा परिपूर्ण कर्णधार मी आजवर पाहिला नाही. प्रत्येक संघाकडे विविध कलागुण अवगत असलेले कर्णधार असतात. मात्र कोहलीत मला सगळे गुण आढळतात. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मालिकांमध्ये विजय मिळवले आहेत,’’ असेही शास्त्री यांनी नमूद केले.

याव्यतिरिक्त शास्त्री यांनी भारताच्या वेगवान माऱ्याचेही कौतुक केले. ‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेनंतरच भारताला उत्तम वेगवान गोलंदाजांची फळी गवसल्याची मला कल्पना आली. २०१९ हे वर्ष आपल्या वेगवान गोलंदाजांनी गाजवले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

विल्यम्सन सर्वोत्तम खेळाडू – कोहली

नवी दिल्ली : विराट कोहलीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला गेल्या दशकभरातील तसेच २००८च्या युवा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. ‘‘२००८ मध्ये मिळवलेला युवा विश्वचषक माझ्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला; परंतु त्या विश्वचषकात विल्यम्सन मला सर्वोत्तम खेळाडू वाटला. त्याचप्रमाणे गेल्या ११ वर्षांत त्याने ज्या प्रकारे न्यूझीलंड संघाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे, ते कौतुकास्पद आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्येसुद्धा तोच मला सर्वोत्तम फलंदाज वाटतो,’’ असे कोहली म्हणाला.