भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कबुली

इंग्लंडच्या सांघिक कामगिरीमुळे नव्हे, तर अष्टपैलू सॅम करन याने मोक्याच्या क्षणी केलेल्या उपयुक्त खेळ्यांमुळे भारताला मालिका गमवावी लागली, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने १-४ अशा फरकाने गमावली. मालिकावीराचा पुरस्कार करनलाच प्रदान करण्यात आला. याबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘आम्ही मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलो, असे मी म्हणणार नाही, परंतु आम्ही आमचे सर्वतोपरी प्रयत्न केले. कर्णधार विराट कोहली व मला जेव्हा इंग्लंड संघातील एका खेळाडूचे मालिकावीर पुरस्कारासाठी नाव विचारण्यात आले. त्यावेळी आम्ही दोघांनीही करनची निवड केली. करनने ज्या कठीण परिस्थितीत संघासाठी धावा केल्या त्याच आम्हाला महागात पडल्या. किंबहुना इंग्लंडपेक्षा करननेच आम्हाला अधिक वेदना दिल्या.’’

‘‘पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ ७ बाद ८७ धावांवर असताना करनने धावा केल्या. त्याच कसोटीच्या पहिल्या डावात आम्ही बिनबाद ५० धावांवर असताना करनने त्याच्या गोलंदाजीने संघाला धक्के दिले. याव्यतिरिक्त, चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावातही संघ ६ बाद ८६ अशा अडचणीत सापडलेला असताना करन संघासाठी धावून आला. यातून हेच सिद्ध होते की महत्त्वाच्या क्षणी त्याने दिलेल्या अमूल्य योगदानामुळेच सामन्याचा व मालिकेचा निकाल ठरला. आणि हाच दोन्ही संघांमधील फरक ठरला,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

पराभूत होऊनही भारताने कसोटीच्या सांघिक क्रमवारीतील अव्वल स्थान अबाधित राखले आहे. याविषयी विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘आम्ही अजूनही जागतिक क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर आहोत आणि इंग्लंडला हे चांगलेच ठाऊक आहे की आम्ही त्यांना कशा प्रकारे झुंज दिली. त्यांची प्रसारमाध्यमे, भारतीय चाहते व आम्हाला स्वत:लासुद्धा याची जाणीव आहे.’’

सततच्या टीकेमुळे विचलित झाल्यासारखे वाटते का, असे विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘मुळीच नाही. मी नेहमीच सकारात्मक विचार करतो व त्याच स्थितीत घरी परततो. माझा संघ काय करतो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे व तो योग्य दिशेनेच मार्गक्रमण करत आहे.’’