रवी शास्त्रींना भारतीय क्रिकेटसंघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, आणि गेले काही महिने सुरु असलेल्या कुंबळे विरुद्ध कोहली वादावर पडला. यानंतर श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला. मात्र अजुनही रवी शास्त्री अनिल कुंबळेंच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. कसोटी मालिका संपल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी कुंबळेंचं नाव न घेता निशाणा साधला. २०१६ साली मी ज्याप्रमाणे भारतीय संघ तयार केला होता, त्यावेळचा आणि आजच्या संघात मला जराही फरक वाटत नाही, असं शास्त्री म्हणाले.

“ज्या कालावधीत मी संघाचा प्रशिक्षक नव्हतो, त्यावेळी नेमकं काय घडलं हे मी बोलू शकत नाही. मात्र आता मी एक गोष्ट विश्वासाने सांगू शकतो की माझ्या याआधीच्या कार्यकाळातला भारतीय संघ आणि आताचा भारतीय संघ यात जराही फरक पडलेला नाहीये. आज संघातल्या प्रत्येक खेळाडूचा आपल्या सहकाऱ्यावर विश्वास आहे.” टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

“सध्याच्या भारतीय संघात खेळाडूंच्या वागण्यात एक विश्वास जाणवतो. जर आम्हाला कोणती गोष्ट अडली तर ती आम्ही प्रशिक्षकांशी बोलू शकतो. हा विश्वास तयार करण्यात मला यश आलंय. जर संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घ्यायची असेल तर मीदेखील एखाद्या कडक शिस्तीच्या मास्तरांप्रमाणे वागू शकतो, आणि संघातल्या प्रत्येकाला याची जाणीव आहे. मात्र मला प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही”, असं म्हणत शास्त्रींनी पुन्हा एकदा कुंबळेंच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा टीका केली.

विराट आणि अनिल कुंबळे यांच्यातला वादाचा फटका भारतीय संघाला चॅम्पियन्स करंडकात बसला होता. अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली होती, त्यानंतर हा वाद संपवताना बीसीसीआयच्या अक्षरशः नाकीनऊ आले होते. अखेर शास्त्रींच्या हाती प्रशिक्षकपदाची सुत्र सोपवतं बीसीसीआयने या वादावर पडदा टाकला. आगामी २०१९ विश्वचषकापर्यंत शास्त्रींच्या हाती संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.