संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना, गेल्या काही आठवड्यांमध्ये देशावर दोनवेळा चक्रीवादळाचं संकट येऊन गेलं. काही दिवसांपूर्वी अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडीशामध्ये मोठी हानी केली. यानंतर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र आणि गुजरातला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील अलिबाग, रायगड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जिवीतहानी टाळण्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफच्या तुकड्या मुंबई आणि इतर महत्वाच्या भागात तैनात केल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सध्याच्या लॉकडाउन काळात अलिबागमध्ये राहत आहेत. रवी शास्त्रींनी अलिबागमधील चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दरम्यान, ‘निसर्ग’नं रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे. वादळाचा काही भाग अजूनही समुद्रात असला, तरी ताशी ११० किमी वेगानं धावणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित झाली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली.