भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीसंदर्भात मोठे विधान केले. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, १५ वर्षे देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला क्रिकेटला कधी निरोप द्यावा, याची चांगलीच जाण आहे. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्यानुसार त्याने निवृत्तीचा निर्णय घेण्याचा हक्क मिळवला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले. शास्त्रींचे धोनीवरील विधान हे निवड समितीच्या सदस्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यापूर्वी बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद म्हणाले होते की, आता आम्ही धोनीच्या पुढे गेलो आहोत. विश्वचषकापासून आम्ही स्पष्ट आहोत. आमचा ऋषभ पंतला पाठिंबा आहे, असे आम्ही स्पष्ट केले आहे.

निवडकर्त्यांपेक्षा भिन्न मत असलेले टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री म्हणाले की, धोनीला चांगले माहिती आहे की, त्याला ग्लोव्हज काढायचे आहेत. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्याने, वृद्धिमान साहाकडे ‘किपिंग ग्लोव्हज’ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले होते.