ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या भवितव्याबाबत भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वक्तव्य केलं. दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळवण्याची अद्यापही संधी आहे. पण तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षणातील चपळता पाहूनच त्यांचा विचार केला जाईल, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, कोणत्याही खेळाडूला संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला मैदानात चांगली कामगिरी करावी लागेल. याशिवाय, क्षेत्ररक्षण आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूला स्वत:ला सिद्ध करावे लागेल. आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करण्याचे काम निवड समिती करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुसरीकडे युवराज सिंगचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. मेहनतीच्या जोरावर तो पुन्हा संघात स्थान मिळवू शकतो, असा विश्वास माजी कर्णधार आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनीही व्यक्त केलाय. सध्याच्या घडीला युवीकडे पुन्हा पुनरागमन करण्याची संधी आहे, असे गांगुली यांनी म्हटले. निवड समितीच्या सध्याच्या धोरणाबद्दल गांगुली यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. सध्याच्या घडीला निवड समिती युवा खेळाडूंना संधी देत आहे. आगामी विश्वचषकाच्यादृष्टीने या निर्णयाचा भारतीय संघास फायदाच होईल, असेही ते म्हणाले.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही रैना आणि युवीला वगळण्यात आले. युवराजला अध्यक्षीय संघातून डावलल्यानंतर त्याच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. मात्र, शास्त्रींच्या या वक्तव्याने दोन्ही अष्टपैलूंना दिलासा नक्कीच मिळेल.