टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुनिल जोशी यांच्या निवड समितीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीच्या कारणामुळे रोहित शर्माला भारतीय संघात स्थान नाकारण्यात आलं. सूर्यकुमार यादवकडेही यंदा निवड समितीने डोळेझाक केली आहे. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आश्वासक खेळी करत असतानाही सूर्यकुमारला संधी मिळत नसल्यामुळे चाहते नाराज झाले होते. त्यातच संघाची निवड झाल्यानंतर सूर्यकुमारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं. सूर्यकुमारच्या या खेळीने प्रभावित झालेल्या रवी शास्त्रींनीही त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला.

परंतू चांगली कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान का मिळत नाही यावर रवी शास्त्रींनी उत्तर दिलं. “सध्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडूंचा भरणा आहे. अशा परिस्थितीत ३० वर्षीय खेळाडूला संधी मिळणं कठीण आहे. म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देतोय. सूर्यकुमार यादवप्रमाणे अजुन ३-४ खेळाडू आहेत की जे चांगली कामगिरी करत आहेत. पण ज्यावेळी तुमच्या सध्याच्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा असतो अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण होऊन बसतं.” टाइम्स नाऊ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री बोलत होते.

मला माझ्या कारकिर्दीतला प्रसंग आठवतो. त्यावेळी भारतीय संघात १ ते ६ क्रमांकावर सर्व खेळाडूंची जागा ही जवळपास निश्चीत मानली जायची. त्यामुळे मधल्या फळीत एखाद्या खेळाडूला संधी मिळणं कठीण व्हायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक क्रिकेटमध्ये काही खेळाडू चांगली कामगिरी करुन खोऱ्याने धावा करत असताना ही स्पर्धा आणखीन मोठी होते, रवी शास्त्रींनी आपलं मत मांडलं. १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. २७ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय संघ यादरम्यान ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.