रवी शास्त्री यांच्याकडे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया आज पार पडली असून कपिल देव यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून रवी शास्त्री यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर संघासोबत रवी शास्त्री यांच्यावरही जोरदार टीका झाली होती. त्यामुळे त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी निवड होईल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण अखेर रवी शास्त्री यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. २०२१ मध्ये भारतात होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम असतील.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. या शर्यतीत रवी शास्त्रीच मुख्य प्रशिक्षक पदावर कायम राहण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली होती. शास्त्री यांच्यासह टॉम मुडी, माइक हेसन, लालचंद रजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमन्स शर्यतीत होते. कपिल देव यांनी रवी शास्त्री यांची निवड करताना कर्णधार विराट कोहलीचं कोणतंही मत विचारात घेतलं नव्हतं असं यावेळी स्पष्ट केलं आहे.

भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. फलंदाजांच्या सुमार दर्जाच्या कामगिरीचा फटक भारताला बसला होता. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते.

२०१७ पासून रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी उंचावली आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धेप्रसंगी ते भारतीय संघाचे संघ संचालक असताना भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, तर यंदाच्या विश्वचषकातही भारताने उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल केली. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची टी २० आणि एकदिवसीय मालिका भारताला जिंकून दिल्यानंतर शास्त्री यांनी आपली दावेदारी आणखी मजबूत केली होती.