गेल्या सामन्यासारखीच या वेळीही वानखेडेची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रामध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली असली तरी या कामगिरीवर समाधानी मात्र नाही. शुक्रवारी इंग्लंडचा पहिला डाव साडेतीनशे धावांमध्ये आटोपण्याचे ध्येय आम्ही डोळ्यांपुढे ठेवले आहे, असे भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

‘‘पहिल्या सत्रामध्ये खेळपट्टीवर दव असल्याने फिरकीपटूंना जास्त मदत मिळाली नाही. पण उपाहारानंतर चेंडू वळायला सुरुवात झाली आणि त्याचा चांगलाच फायदा आम्हाला झाला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात माझ्याकडून चांगली गोलंदाजी झाली. यापुढे खेळपट्टी फिरकीला मदत करेल,’’ अशी आशा अश्विनने व्यक्त केली.

तो पुढे म्हणाला, ‘‘या मालिकेत आमच्याकडून काही झेल सुटले. माझ्याकडूनही झेल सुटले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी काही झेल आम्हाला टिपता आले नाहीत. पण ते सहज झेल नक्कीच नव्हते. पण यापुढे नक्कीच आम्हाला क्षेत्ररक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे.’’

‘‘पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या किटन जेनिंग्सने चांगली फलंदाजी केली. जेनिंग्सचा बचाव फारच चांगला आहे. त्यामुळेच त्याला आमच्या गोलंदाजीविरुद्ध शतक झळकावता आले,’’ असे अश्विन म्हणाला.

विक्रमाचा आनंद काही औरच

सामन्याच्या पहिल्या दिवशी आर. अश्विनने (२३९) चार बळी मिळवत माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ (२३६) यांना मागे टाकले. याबाबत अश्विन म्हणाला की, ‘‘माझ्या ध्यानात ही गोष्ट आली नाही. लहानपणापासून श्रीनाथ यांची गोलंदाजी मी पाहत आलो आहे, माझ्यासाठी तेदेखील एक आदर्शवत होते. त्यामुळे त्यांचा बळींचा विक्रम मागे टाकल्याचा आनंद काही औरच आहे.’’