भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने २०१७ वर्षांसाठीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा सीएट क्रिकेट मानांकन पुरस्कार पटकावला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे बुधवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि आरपीजी इंटरप्रायझेसचे कार्याध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या हस्ते अश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारताने मागील हंगामात १३ पैकी १० कसोटी सामने जिंकण्याची किमया साधली. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये अश्विनने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. मागील १२ महिन्यांत अश्विनने एकंदर ९९ बळी घेतले आहेत.

युवा फलंदाज शुभम गिलला वर्षांतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत झालेल्या भारत-इंग्लंड युवा संघांमधील सामन्यांत शुभमने लक्षवेधी कामगिरी केली होती.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गावस्कर आले होते, तेव्हा बालपणी मी त्यांची पहिली स्वाक्षरी घेतली होती, अशी आठवण अश्विनने या वेळी जागवली. याचप्रमाणे वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचे कौतुकही केले.

चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत गोलंदाजीच्या नवीन शैलीचा प्रयोग करण्याच्या विचाराधीन आहे. असे करण्यासाठी मी पुरेसा सज्ज आहे. या स्पध्रेपूर्वीच्या दोन सराव सामन्यांतून माझी मुख्य स्पध्रेतील कामगिरी कशी होईल, याची कल्पना मिळेल.  – रविचंद्रन अश्विन, भारताचा फिरकी गोलंदाज