भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्स यांच्यात ‘ट्विटर’च्या खेळपट्टीवर झालेला वाद समाजमाध्यमांवर चर्चेत राहिला. गिब्सच्या गमतीनंतर अश्विन संतापला आणि त्याने गिब्सला सामना निश्चिती करणारा असे संबोधले.

अश्विनने एका बुटाच्या ब्रँडविषयी ट्विटरवर माहिती देताना तो धावण्यासाठी किती सोयीस्कर असल्याचे मांडले आणि तो परिधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले. त्यानंतर अश्विनची चेष्टा करताना गिब्सने ट्विट केले की, ‘‘अश्विन, आता तू अधिक वेगाने धावू शकशील अशी आशा करू या.’’

त्यानंतर मात्र अश्विनचा पारा चढला आणि त्याच त्वेषाने त्याने म्हटले की, ‘‘तू जितक्या वेगाने धावलास, दुर्दैवाने तितक्या वेगाने मी नक्कीच धावू शकणार नाही. परंतु सामने निश्चित न करू शकणारी उत्तम तत्त्वे मी जोपासतो आणि त्यामुळेच माझ्या थाळीत दररोज अन्न असते.’’

२००१मध्ये एका सामना निश्चिती प्रकरणात सहभागी असल्याची कबुली गिब्सने दिल्यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती आणि दंडसुद्धा ठोठावला होता. मग मात्र सपशेल शरणागती पत्करत गिब्स म्हणाला, ‘‘थट्टामस्करी तुला नीट समजत नाही, असे वाटते. ठीक आहे.’’

आपल्या थेट प्रतिक्रियेमुळे गिब्सला वास्तववादाची जाणीव करून दिल्यानंतर अश्विन थोडा सावरला आणि ट्विटरवर म्हणाला, ‘‘माझे उत्तरसुद्धा एक चेष्टाच होती. परंतु तू आणि समाजमाध्यमांवरील बाकीच्यांना ती समजली नाही. अशा प्रकारच्या थट्टामस्करीसाठी मी नेहमीच तयार असतो. कधीतरी रात्रीच्या भोजनासाठी भेटू आणि यावर छान गप्पा मारू!’’