एम.एस. धोनीच्या निवृत्तीपर्यंत पंतची त्याच्याशी सातत्यानं तुलना केली जायची. आता वृद्धीमान साहाच्या यष्टीरक्षणाशी त्याची तुलना केली जात आहे. त्यामुळे या तुलनात्मकतेतून ऋषभ पंत याला विश्रांती देण्यात यावी, असा सोज्वळ सल्ला भारताचा महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं पंतची तुलना करणाऱ्यांना दिला आहे. चेन्नई येथेली चेपॉक स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यादरम्यान पंतनं आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळ थांबल्यानंतर पंतची तुलना करणारा प्रश्न अश्विन याला विचारला असता त्यानं सोज्वळ सल्ला दिला.
सामन्यानंतर बोलताना अश्विन म्हणाला की, “ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत आहे. त्यासोबतच तो आपल्या यष्टीरक्षणातील उणीवा दूर करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. अनेकदा तुमची तुलना सर्वोत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या खेळाडूंसोबत केली जाते. ही तुलना तुमच्यासाठी घातक आणि अवघढ ठरु शकते. ऋषभ पंतकडे चांगली क्षमता आहे म्हणून तो आज इथं पोहचू शकला. तसेच तो आपली कामगिरी चोख बजावत असल्याची मला काडीमात्र शंका नाही.”
आणखी वाचा- Ind vs Eng Video: कमनशिबी पुजारा! ‘अशा’ विचित्र पद्धतीने झाला बाद
अश्विन पुढे म्हणाला की, ऋषभ पंतला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तो सतत आपल्या चूका सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. यापुढेही तो असाच प्रयत्न करत राहिल. ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासीक विजयात पंतचा सिंहाचा वाटा होता. धोनीशी तुलना झाल्यानंतर त्यालाही बरं वाटत असेल पण तो स्वतची वेगळी ओळख निर्माण करु इच्छितो हे विसरता कामा नये.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 9:26 am