घरच्या मैदानावर बांगलादेशला टी-२० आणि कसोटी मालिकेत पराभवाचं पाणी पाजल्यानंतर, भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. ६ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून दोन्ही संघ यात ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून, निवड समितीने कृणाल पांड्याला संघातून वगळलेलं आहे. भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनीही टी-२० क्रिकेटमध्ये कृणालपेक्षा रविंद्र जाडेजा चांगला पर्याय असल्याचं म्हटलंय.

“माझ्या मते टी-२० क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर भारताला अशा अष्टपैलू खेळाडूची गरज आहे, जो आपली ४ षटकं टाकू शकतो आणि चांगली फटकेबाजीही करु शकतो. जाडेजा या निकषांमध्ये योग्य आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला मनगटाने चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूंची गरज आहे. भारतीय संघाच्या टी-२० क्रिकेटमधील विजयी कामगिरीत, या दोन्ही फिरकीपटूंचा (कुलदीप आणि चहल) चा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपल्याला अशा खेळाडूची गरज आहे, जो ४ षटकं टाकून धावाही काढेल. कृणालला आतापर्यंत मिळालेल्या संधीत त्याने हवी तशी कामगिरी केली नाहीये”, बांगर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

 

विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार</p>