न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय डाव कोलडमला. भारताचे दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार कोहली संघाचा धावफलक ५ वर असताना तंबूत परतले. सलामीवीर के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी एक धाव करुन बाद झाले. भारताचा डाव गडगडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पंतही झेलबाद झाला. तर तशाप्रकारे हार्दिक पांड्याही बाद झाल्याने संघाचा धावफलक १०० वर पोहचण्याआधीच सहा खेळाडू तंबूत परतले आहेत. ३० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पांड्या बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजांची शेवटची जोडी मैदानात खेळत आहे. आठव्या क्रमांकावर जाडेजा मैदानात उतरला असून आता भारताच्या सर्व आशा धोनी आणि जाडेजाच्या जोडीवर अवलंबून आहेत. इतिहास पाहिला तर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना जाडेजाने २०१४ साली अशाप्रकारच्या स्थितीमध्ये धडाकेबाद फलंदाजी करुन सामना अनिर्णित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

पाच वर्षांपूर्वी २५ जानेवारी २०१४ ऑकलंडच्या मैदानात झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघ ३१५ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला होता. या सामन्यामध्ये ३६ व्या षटकामध्ये जाडेजा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा भारताला १४ षटकांमध्ये १३१ धावांची गरज होती. त्यावेळी जाडेजाने आर. अश्वीनच्या सोबतीने तुफानी खेळी करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. या सामन्यात अश्विनने ४६ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या तर जाडेजा ४५ चेंडूमध्ये ६५ धावा करत नाबाद राहिला होता. या खेळीमध्ये जाडेजाने पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४६.४७ च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

अशाच प्रकारची खेळी जाडेजाने आज केल्यास भारताला विजय मिळवणे शक्य होईल अशी शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.