भारतीय संघातून वगळल्यामुळे गेली अनेक महिने डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा पुनरागमनाच्या प्रतीक्षेत होता. मात्र याच कालखंडाचा जडेजाने अतिशय छान वापर केला आणि गोलंदाजीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्याच्या या मेहनतीचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया भारताचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केली.

सध्या चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी मालिकेत जडेजा रविचंद्रन अश्विनच्या साथीने भारताच्या फिरकी माऱ्याची धुरा सांभाळत आहे. या दोघांच्याही खात्यावर तीन डावांत मिळून प्रत्येकी १२ गुण जमा आहेत.
‘‘भारतीय संघातून वगळल्यानंतर त्याने आपल्या कामगिरीचा बारकाईने अभ्यास करून योग्य सुधारणा केली. सौराष्ट्रकडून रणजी करंडक खेळताना ३०हून अधिक बळी घेतल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे,’’ असे अरुण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘एकदिवसीय क्रिकेट असो वा कसोटी, जडेजा हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला आपल्या क्षमतेचा अचूक वापर करता येतो.