भारताच्या रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. यावेळी त्याने बांगलादेशच्या शकिब अल हसनला पिछाडीवर टाकले आहे.

कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराने ८८८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पुजाराने दमदार फलंदाजी केल्यामुळे त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत भारताचा विराट कोहली पाचव्या आणि अजिंक्य रहाणे सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ या क्रमवारीत अव्वल स्थानावर असून इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती, त्याचबरोबर सात बळीही मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावरच त्याने अव्वल अष्टपैलू खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विनची एका स्थानाने घसरण झाली असून तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनबरोबर संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव अनुक्रमे २० आणि २२व्या स्थानावर आहेत.